ठाणे : मध्य रेल्वेवरील जंक्शन असलेल्या दिवा स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेकडील ब्रिटिशकालीन धोकादायक झालेला पादचारी पूल अखेर बुधवारी रात्री पाच तासांत पाडण्यात आला. यासाठी जलद मार्गावरील दोन कल्याण लोकल रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिवा स्थानकातील फलाट क्रमांक १ ते ६ या सीएसएमटी दिशेकडील जुना पादचारी पुलाची मध्यंतरी आयआयटी आणि मध्य रेल्वे प्रशासनाने केलेल्या संयुक्त पाहणीत तो धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तो पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यावर तो दोन टप्प्यांत पाठण्यात आला. मुंबई येथे गेल्या महिन्यात पादचारी पूल कोसळल्यानंतर हा मुद्दा आता गांभीर्याने घेतला जात आहे.पहिल्या टप्प्यात फलाट क्रमांक १ आणि ३ येथील त्याचा भाग पाडण्यात आला. तसेच दुसऱ्या टप्यात म्हणजे बुधवारी रात्री फलाट क्रमांक ४ आणि ६ येथील फलाटावरील भाग पाडून त्याचा मलबा तातडीने हलवण्यात आला.
हे काम बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुरू झाले. नियोजित वेळेनुसार पहाटे ३.३० वाजेपर्यंत ते काम पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. या धोकादायक पुलाचे जिने नव्याने बांधलेल्या पुलाला जोडल्याने ते मात्र पाडण्यात आलेले नाहीत.