- सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांमध्ये स्वाईनपाठोपाठ डेंग्यूचा ताप वाढत आहे. उल्हासनगर शहरात तिघांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरू आहेत. उल्हासनगरसह ठाणे मनपा, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भार्इंदर या सहा पालिकांत आतापर्यंत डेंग्यूमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात हिवताप व डेंग्यूची साथ १० ठिकाणी आहे. यामध्ये डेंग्यूचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत सुमारे २७४ रुग्ण डेंग्यूमुळे फणफणले. यात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून हिवतापाने दोघे दगावले आहेत. यामुळे महापालिकांनी त्यावर लक्ष केंद्रित करून त्यास वेळीच आळा घालण्यासाठी सतर्क रहायला हवे.उल्हासनगरातील लालचक्की, संभाजी चौक हा परिसर डेंग्यूच्या लागणसाठी आयडेंटीफाय करण्यात आला आहे. मीरा-भार्इंदरमध्ये नुकतेच १० जण डेंग्यूच्या तापाने त्रस्त होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला. भिवंडी मनपात तीन रुग्ण असून त्यातील एक दगावला. कल्याण-डोंबिवलीमध्येही डेंग्यूचे तीन रुग्ण असून एकाचे निधन झाले. ठामपातही दोनदा उद्भवलेल्या साथीमध्ये ९२ रुग्ण डेंग्यूसदृश होते. यातील दोघांचे निधन झाले. भिवंडी तालुक्यातील शेलार येथे डेंग्यूच्या तापाचे २१ रुग्ण आढळून आले आहेत.डेंग्यू ठरतोय जीवघेणाभिवंडीच्या पडघ्याजवळील कासणे, डोहळ येथे ८९ रुग्ण डेंग्यूचे संशयित होते, तर शहापूर तालुक्यातील धामनी येथे ५६ रुग्ण डेंग्यूच्या तापाचे संशयित असल्याचे निदर्शनात आले. हिवतापाच्या तुलनेत डेंग्यूचा ताप नागरिकांसाठी जीवघेणा ठरला आहे.
आता डेंग्यूचे थैमान; जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 5:54 AM