भिवंडी : तालुक्यातील दापोडा गावच्या हद्दीतील हरिहर कम्पाउंडमधील प्लॅस्टिक दाण्यांपासून मोती बनवण्याच्या कारखान्यात आग लागून चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारखान्याचे मालक अजय देढिया व व्यवस्थापक शिवपूजन चौधरी यांना बुधवारी अटक केली. कारखान्यात मोती उत्पादन करण्याच्या मशिनची काळजी घेतली नाही, असे पोलिसांना प्राथमिक तपासात आढळून आले. मशिनच्या कन्व्हेअर बेल्टवर मॅग्नेटिक क्रेटर न बसवल्यामुळे, तसेच फिल्टरची डिस्क नियमित साफ न केल्याने, धातूचा तुकडा फिल्टर मशिनमध्ये पडून अचानक मशिनमध्ये बिघाड झाला. मशिनमधून ठिणग्या उडू लागल्या. त्यामुळे आग लागून फिल्टर मशिनचा स्फोट झाला, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कारखान्यात कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्याचा मार्गही ठेवलेला नव्हता. त्यामुळे या आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले अजय देढिया व व्यवस्थापक चौधरी यांच्याविरोधात नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोघांना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना जामीन मिळाला आहे. (प्रतिनिधी)
दापोडा आगप्रकरणी मालकास अटक
By admin | Published: February 23, 2017 4:33 AM