- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-१ धोबीघाट टेकडी परिसरात संततधार पावसाने दरड कोसळून तीन पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त झाली. तर अनेक घरांना धोका निर्माण झाला. स्थानिक नगरसेविका ज्योती गायकवाड यांनी उपायुक्त अशोक नाईकवाडे, शहर अभियंता महेश शितलानी यांची भेट घेऊन सरंक्षण भिंत बांधण्याची मागणी केली.
उल्हासनगर कॅम्प नं-१ धोबीघाट परिसरातील उंच टेकडीवर असंख्य घरे बांधण्यात आली असून संततधार पावसाने टेकडीची दरड कोसळत आहे. जुलै महिन्यात अशीच दरड कोसळून अनेक घरांना तडे गेले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी अनेक घरांना नोटिसा देऊन घरे खाली करण्यास भाग पडल्याने, यावेळी जिवीतहानी झाली नाही.
बुधवारी सकाळी संततधार पावसाने पुन्हा दरड कोसळून ३ पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त झाली. तर अनेक घरांना धोका निर्माण झाल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी माहिती दिली. भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख, मेनुद्दीन शेख आदींनी टेकडीला संरक्षण भिंत बांधून दुर्घटनाग्रस्त झालेल्या नागरिकांना पर्यायी जागा देण्याची मागणी होत आहे.
महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे, शहर अभियंता महेश शितलानी, शाखा अभियंता तरुण सेवकांनी यांनी यासाठी काय उपाययोजना करता येईल. याबाबत चर्चा करून सरंक्षण भिंत बांधण्याचे संकेत दिले. तर स्थानिक नगरसेविका ज्योती गायकवाड, माजी नगरसेवक व शिवसेना उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, मनसेचे शहर संघटक मैनिद्दीन शेख आदींनी सरंक्षण भिंतीसाठी कमीतकमी २५ लाखाचा निधी देण्याची मागणी महापालिकेकडे केली. दरड कोसळल्याने टेकडीवरील नागरिक भितिच्या छायेत आहेत. घरे कोसळून बेघर झालेल्या नागरिकांनी पर्यायी घरे देण्याची मागणी केली असून महापालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.