ठाणे : शिवसेनेने सत्तेची पर्वा कधीच केली नाही. निवडणूक १० दिवसांवर आलेली असताना २६ बंडखोरांना लाथ मारून हाकलून देण्याची हिम्मत केवळ शिवसेनाच दाखवू शकते, असे पक्षाचे उपनेते अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले. कमळ चिखलात उगवते आणि सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी ज्यांनी आपल्यासाठी चिखल तुडवला, त्यांना आज भाजपा विसरली असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. निवडणुकीच्या निमित्ताने विटावा, मनीषानगर, वृंदावन येथील सभेत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, केदार दिघे या वेळी उपस्थित होते. टी. चंद्रशेखर यांनी ठाण्यात अनधिकृत बांधकामांविषयी धडक मोहीम चालवली होती. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सत्तेची ताकद प्रशासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते, तेव्हाच शहरात विकासाची कामे होऊ शकतात आणि हेच शिवसेना करत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते मेट्रो प्रकल्प महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नसताना आम्हाला ठाण्यात सत्ता द्या, मेट्रो प्रकल्प आणतो, हे मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या सभेत खरपूस समाचार घेतला. केंद्रात आणि राज्यात तुमचीच सत्ता आहे. मेट्रो आणायला तुम्हाला कोणी अडवले आहे, असा सवालही त्यांनी केला. दिव्यामध्ये केवळ ११ जागांसाठी मुख्यमंत्री दिव्यात येतात. दिवा जलद लोकलसाठी दिव्यात रेल रोको झाला, तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते, असा सवालही त्यांनी केला.
‘बंडखोरांना लाथ मारण्याची हिम्मत केवळ सेनेतच’
By admin | Published: February 14, 2017 2:56 AM