पालघर - वाडा तालुक्यातील वडवली येथे राहणारे आणि महसूल विभागातून उपजिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झालेले नामदेव जाधव यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकला. या दरोड्यात हल्लेखोरांनी जाधव यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे.
मंगळवारी पहाटे 3.25 वाजताच्या सुमारास सात अज्ञात दरोडेखोरांनी माजी उपजिल्हाधिकारी जाधव यांच्या स्वयंपाकगृहाच्या खिडकीतून घरात प्रवेश केला. त्यानंतर, घरात झोपलेले त्यांचे भाऊ प्रकाश, आई व अन्य नातेवाईकांना पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून धमकावले. तसेच दरोडेखोरांनी जाधव यांच्या आईकडे चाव्यांची मागणी करून घरातील पाचही कपाटांच्या चाव्या ताब्यात घेत कपाटातील ३ गंठन, ५ अंगठ्या, धनेमाळ १, चैन, मंगळसुत्र असा सुमारे २० तोळ्यांचा ऐवज आणि २५ हजार रोकड लुटून नेला. एकंदरीत सुमारे चार लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. वडवली गावातील भर वस्तीत असलेल्या घरात राजरोसपणे हा दरोडा पडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९५ व आर्म अक्ट ३/२५ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास वाडा पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे हे करीत आहेत.