लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मार्च २०२० पासून कोरोना रुग्ण व ज्येष्ठ नागरिक यांना २४ तास विविध सेवा पुरवणारे दिग्दर्शक व अभिनय कट्ट्याचे संस्थापक किरण नाकती यांनी समाजसेवेचे आणखीन एक शिवधनुष्य उचलले आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे ते स्वत: दशक्रिया विधी व अस्थिविसर्जन करत आहेत. आतापर्यंत त्यांनी १८ जणांचे अस्थिविसर्जन केले आहे. ‘आदित्य प्रतिष्ठान’ व ‘वुई आर फॉर यू’ मार्फत ते या सेवा देत आहेत.
स्मशानात मृत व्यक्तींच्या अस्थी बाजूला ठेवल्याचे नाकती यांनी पाहिले. या अस्थी घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक स्मशानात फिरकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर एकामागून एक घडलेल्या प्रसंगामुळे ते या सेवेकडे वळले. एक आजोबा उपचारासाठी दाखल झाल्यावर ते कोरोनाने मृत पावले. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी रुग्णवाहिकेतून स्मशानात नेताना नाकतीही उपस्थित होते. आजोबांचे कोणी नातेवाईक नसल्याने त्यांच्या बहिणीने दशक्रिया विधी व त्यांचे अस्थिविसर्जन नाकती यांनीच करावे, अशी विनंती केली. त्याला मान देत हे कार्य नाकती यांनी केले. तिथून या सेवेला सुरुवात झाली. जसे फोन येतात तसे कोरोनाबाधित मृतांचे दशक्रिया विधी आणि अस्थिविसर्जन करत असल्याचे नाकती म्हणाले.
दरम्यान, कोरोनाकाळात मागील वर्षभर ज्येष्ठ नागरिक, कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना घरपोच औषधे, टिफीन, वैद्यकीय तपासणी, समुपदेशन अशा १६ सेवा नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य प्रतिष्ठानमार्फत पुरवल्या जात आहेत. घेऊया लसीची साथ, करूया कोरोनावर मात असे म्हणत कोरोना लसीकरण मार्गदर्शन व साहाय्य सेवाही सेवा सुरू केली आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यापासून ते अगदी घरापासून ते लसीकरण केंद्रापर्यंत व केंद्रापासून ते पुन्हा घरापर्यंत नेण्यासाठी मोफत रिक्षा सेवा, त्यादरम्यान प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हेसुद्धा काम नाकती स्वतः करत आहेत.
कुटुंबापासून दूर राहून सेवा
मार्च २०२० पासून पुढील नऊ महिने नाकती यांनी कुटुंबापासून दूर राहून ठाणेकरांना सेवा दिली. कोरोनाची दुसरी लाट आल्यावर पुन्हा घरापासून दूर राहून ते ठाणेकरांसाठी धडपडत आहेत. नाकती यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, अशी इच्छा ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे.
---------