ठाणे : “बायका सोशीक असतात आणि नवरे रागीट असतात असं आपण मानत असलो, तरी जगभरातल्या नवरा-बायकोंच्या नात्याचा अभ्यास हेच सांगतो की,‘नवरा हा बायकोचं ऐकतो’. पण दुर्दैवाने, महिलांना आता लग्नासोबत येणा-या जबाबदा-या नकोशा झाल्यामुळे आणि महिला स्वातंत्र्याचाच चुकीचा अर्थ काढल्यामुळे मिलेनिअल जोडप्यांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे, वैवाहिक संबंधांत अडचणी आल्या तरी महिलांनी वैवाहिक जीवनाचा आपल्या हातातला रिमोट कंट्रोल सोडू नये” असं प्रतिपादन मॅरेज कोच लीना परांजपे यांनी केलं.
आजच्या काळातील ‘मिलेनिअल कपल्स’ची मानसिकता आणि गरज ओळखून “मी, लग्न आणि ....!” या कार्यक्रमाचं आयोजन ‘ठाणेकर’ प्रिती मांडके यांनी ठाण्यातील घंटाळी येथील सहयोग मंदिरात केलं होतं. गीत-संगीत आणि संवाद-मुलाखत अशा सादरीकरणातून ‘नांदा सौख्यभरे’चं गोडगुपीत उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे करण्यात आला. देशातील एकमेव मॅरेज कोच असलेल्या लीना परांजपे यांनी यावेळी लग्नसंबंधांच्या विविध पैलूंवर झगझगीत प्रकाश टाकला. “विवाहबाह्य संबंध ही आता फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिला विशेषत तरूण महिलांमध्येही विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण खूपच वाढलं आहे.‘ग्लीडेन’सारख्या डेटिंग- फ्लर्टिंग चॅप अॅपचा वापर करणा-यांमध्ये लग्न झालेल्या भारतीय महिलांचं प्रमाण वाढत आहे. नव-यासोबत भावनिक बंध निर्माण करण्यात अपयश आलेल्या महिला बाहेरच्या परपुरुषाशी चॅटिंग करून मानसिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करताहेत. नवराबायको एकमेकांना वेळ देण्याचं सोडून, एकमेकांशी संवाद साधायचं सोडून डेटिंग अॅपमधून पळवाट काढत आहेत. यामुळे वैवाहिक जीवनात नवनव्या समस्या उदभवत आहेत”, असंही लीना परांजपे यांनी सांगितलं.
पुरुषांप्रमाणे सिगारेट ओढणं, दारू पिणं या सवयी आता तरुणींनी आत्मसात केलेल्या आहेतच, पण त्याचबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवणं किंवा जोडीदारासोबतची वचनबद्धता न पाळणं अशा गोष्टीसुद्धा सर्रास आढळून येताहेत. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, लग्न वाचवण्यासाठी बायकांपेक्षा नवरेच पुढाकार घेताना दिसताहेत, असंही लीना परांजपे यांनी सांगितलं. विवाहपूर्व मॅरेज कोचिंगची आवश्यकता सांगताना लीना परांजपे म्हणाल्या, “आजची नवीन पिढी जीवनातल्या लहान-सहान गोष्टी जाणीवपूर्वक शिकून आत्मसात करते. आपण इंग्रजी शिकतो, व्यवसाय कसा करावा हे शिकतो, स्वयंपाक कसा करावा हे शिकतो, पण लग्नासारख्या महत्वाच्या गोष्टीशी संबंधित बाबी शिकण्यात आपण अवघडतो. तुमचं, तुमच्या जोडीदाराचं, तुमच्या मुलांचं, तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं सुख ज्यात दडलेलं आहे, ते लग्न सांभाळायला शिकणं महत्वाचं नाही का?”असा सवालही लीना परांजपे यांनी श्रोत्यांशी संवाद साधताना उपस्थित केला. प्रिती मांडके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सांगितिक कार्यक्रमात प्रशांत लळीत, अमेय ठाकूरदेसाई, सिद्धार्थ कदम, झंकार कानडे यांनी संगीताची, तर धनश्री देशपांडे, नचिकेत देसाई, रश्मी वर्तक यांनी गायनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मयुरेश साने यांनी या कार्यक्रमाचं खुमासदार सूत्रसंचालन केलं.
…… ……. ……. …….. ……. …….. ……….
मॅरेज कोच:
विवाहविषयक समुपदेशकाचं म्हणजे मॅरेज काऊन्सिलिंगचं काम पॅसिव्ह आहे, तर विवाह प्रशिक्षक म्हणजे ‘मॅरेज कोच’चं काम अॅक्टिव्ह आहे. ज्याप्रमाणे क्रिकेट टीमचे प्रशिक्षक खेळाडूंसोबत राहून त्यांच्याकडून नियमित सराव करवून घेतात, त्याप्रमाणे मॅरेज कोचसुद्धा आवश्यकता भासल्यास जोडप्यांसोबत प्रत्यक्ष राहून त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांना थेट सूचना देतात.
आवश्यकता:
नवविवाहितांमध्ये घटस्फोट घेणा-यांचं प्रमाण २०१० पर्यंत चार टक्के होतं, ते २०१९मध्ये १४ टक्क्यांच्यावर गेलं आहे!
घटस्फोटांचं प्रमुख कारण:
सध्याच्या काळात जोडीदाराकडून फक्त जवळीक अपेक्षित नसते, तर लग्नानंतरही एकमेकांची वैयक्तिक वाढ आणि विकास शक्य होईल, हीसुद्धा अपेक्षा असते. दुर्दैवाने,बदलत्या जीवनशैलीमुळे आपलं नातं टिकवण्यासाठी आजची जोडपी एकमेकांना अत्यंत कमी वेळ देतात आणि त्यामुळे त्यांचे नाते टिकवण्याचे प्रयत्नही अपुरे पडतायत.