भातसानगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आमदार पांडुरंग बरोरा यांना गळाला लावून राष्टÑवादी काँग्रेसला शहापूर तालुक्यात मोठा धक्का दिला होता. मात्र, बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षातील अस्तित्व धोक्यात आल्याने नाराज माजी आमदार दौलत दरोडा यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे. यावर दरोडा यांनी राष्ट्रवादीचे नाव घेतले नसले तरी निवडणूक लढवण्याबाबत संकेत दिल्याने तालुक्यातील पक्षीय राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधून बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून शहापूरमधून त्यांनाच उमेदवारी मिळण्याचे निश्चित झाले आहे. त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली असून दरोडा यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. बरोरा यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेनेच्या पाच इच्छुकांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावून निष्ठावंतालाच संधी देण्याची मागणी केली होती. मात्र, तसे होताना दिसत नसल्याने दरोडा यांचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत सूत जुळून आल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याबाबत तालुक्याच्या विकासासाठी आपण समविचारी पक्षात जाऊन निवडणूक लढवू, असे दौलत दरोडा यांनी स्पष्ट केल्याने या वृत्ताला एकप्रकारे दुजोराच दिला.
दौलत दरोडा यांना राष्ट्रवादीची उमेदवारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 1:31 AM