ठाणे : खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरच्या आतापर्यंतच्या चौकशीतून कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचे दुबई कनेक्शन प्रकर्षाने समोर येत आहे. भारताच्या तुलनेत दुबईत सुरक्षा यंत्रणांना टाळणे सहज शक्य असल्याने दाऊद इब्राहिम आणि अनिस इब्राहिम हे अधूनमधून दुबईला जात असल्याची माहितीही इक्बालने पोलिसांना दिली आहे.एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह तिघांना ठाणे पोलिसांनी गेल्या सोमवारी मुंबईतून अटक केली. आठ दिवसांच्या पोलीस कोठडीत असलेल्या इक्बालची खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा चौकशी करत आहेत. सुरुवातीला इक्बाल चौकशीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची मोजक्या शब्दांत उत्तरे द्यायचा. अलीकडे तो थोडेफार बोलू लागला आहे.दुबई वाटते सुरक्षितपाकिस्तानातून येणारे कॉल्स सुरक्षा यंत्रणेकडून ‘टॅप’ होण्याची शक्यता असते. दुबईकडे त्यादृष्टीने सरकार बघत नाही. शिवाय तेथील सुरक्षा यंत्रणांना टाळणे शक्य असते. त्यामुळे दाऊद आणि अनिस इब्राहिम हे दुबईला जाऊन येतात, असे इक्बालने सांगितले.त्यामुळे दुबईहून पाकला स्थलांतर केल्यानंतरही दाऊदच्या दुबईवाºया सुरूच असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. मात्र, दाऊदने दुबईतून इक्बालशी संपर्क साधल्याची माहिती अद्यापतरी पोलिसांसमोर आलेली नाही.इक्बालची पत्नी रिझवाना हसन आणि दोन मुले दुबईमध्ये आहेत. त्याला कुटुंबासाठी दुबई सर्वाधिक सुरक्षित वाटली. दाऊदची पत्नी मेहजबीन खान ही गेल्या वर्षी दुबईला आली असता, रिझवानाच्या फोनवरून तिने इक्बालसोबत संभाषण केले होते.प्रचंड नशेमुळे इक्बालला सर्वच गोष्टी आठवत नाहीत. जे स्मरणात आहे, त्यापैकी थोडेफार हातचे राखून तो पोलिसांना माहिती देत आहे.
दाऊद, अनिस इब्राहिमच्या दुबईवा-या अजूनही सुरूच!, इक्बाल बोलू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 3:23 AM