विजय नवलगिरे याचा ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिम भागातील बालाजीनगर परिसरातील दर्शना नावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. विजय आणि याच परिसरात राहणाऱ्या आरोपींचे पूर्वीपासून वाद असल्याने त्यांच्या मनात या प्रेमविवाहामुळे आणखी संताप वाढला होता. त्यातच गेल्या वर्षी रामू कोली याचे ताडीचे दुकान विजयने बंद पाडले होते. त्याचादेखील राग आरोपींच्या मनात होता. हे सर्व सुरू असतानाच १२ मे रोजी विजय आणि आरोपी जगदीश उर्फ जग्गू मुंगर यांच्यात वादावादी होऊन मारहाण झाली होती. याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी आरोपींनी थेट विजय याचे घर गाठले. घराचे दार बंद असताना त्यांनी लाथा मारून दरवाजा तोडला. घरात जाताच विजयच्या डोळ्यावर स्प्रे मारून त्याला ओढत इमारतीखाली आणले. यादरम्यान विजयची पत्नी वाचविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांनी मिळेल त्या वस्तूने विजयवर हल्ला केला. एवढेच नव्हेतर, त्याला फरफटत नेत त्याच्या डोक्यावर दगड टाकला.
आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी हे सर्व आरोपी एकत्रित आले होते. आरोपी कालिदास कोली, जग्गू मुंगर, सोनू स्वामी, रामू कोली, राजू निंदी, आनंद, चिंटू, जयेश आणि एका अनोळखी इसमाने ही हत्या केली.
ही हत्या करताना आरोपीने पेव्हर ब्लॉक आणि सिमेंटच्या ठोकळ्याचा वापर केला. एका आरोपीने स्वतःच्या ताब्यातील कटरच्या साह्याने विजयच्या मानेवर वार केले. पोलिसांनी पाच आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कालिदास कोली, जग्गू मुंगर, सोनू स्वामी, रामू कोली आणि जयेश यांचा समावेश आहे.
----------------------