ठाणे : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर भूमिपुत्रांच्या या आंदोलनामध्ये ठाणे जिल्ह्यातून देखील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व सहा महापालिका आणि प्रत्येक तालुक्यामधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मंगळवारी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यावरून सध्या राजकारण तापले असून त्यांच्या नावाला पाठिंबा देण्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. त्यामुळे आता या लढ्यात वंचित बहुजन आघाडीदेखील पूर्ण ताकदीने उतरणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष सुनील भगत, प्रवक्ते उन्मेष बागवे आणि महासचिव ॲड. किशोर दिवेकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि जे. आर. डी. टाटा यांची नावे कधीच चर्चेत नसताना दि.बा पाटील यांच्या नावाला विरोध करण्यासाठी ही नावे पुढे करण्याचे हे गलिच्छ राजकारण आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला पर्याय नाही, असे स्पष्ट मत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या मुद्यावरूनच नव्हे तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून देखील ठाणे जिल्ह्यातून लढा उभारण्यात येणार असल्याचे भगत यांनी सांगितले.