मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील बेकायदा तबेल्यांना संरक्षण दिले जात आहे. येथील एका तबेल्यातून एक मृत जनावर वस्तीलगतच्या सरकारी पाणथळ जागेमध्ये फेकल्याचा प्रकार उघड झाला आहे.
भाईंदर पश्चिमेस गणेश देवलनगर येथे सरकारी जमीन व सीआरझेडमध्ये भीमबहादूर खाडका या इसमाने बेकायदा तबेला बनवला आहे. या ठिकाणी गायी असून
त्यांच्यासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत. या गुरांचा व्यावसायिक वापर केला जातो. मात्र, त्यांची काळजी घेतली जात नाही. त्यातच गाय वा गुराचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह वस्तीलगतच्या सरकारी खाजणात टाकला जातो. असा प्रकार बुधवारी व्हिडीओद्वारे उघड झाला आहे. मृत गायीला पाण्यातून ओढतओढत नेऊन लोकवस्तीलगत असलेल्या खाजणात फेकून देण्यात आले. उघड्यावर फेकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच या प्रकारांमुळे रोगराईचा धोका वाढला आहे. त्यामुळे तबेले हटवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि गुरांना गोशाळेत हलवावे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग या बेकायदा तबेल्यांकडे दुर्लक्ष करत आहे. गुराचा मृत्यू झाल्यास त्याची नोंद व रीतसर विल्हेवाट पालिकेच्या मंजुरीनुसार करावी लागते. पण, गोवंशाच्या छळाला आणि विनापरवानगी तबेल्यांना महापालिका जबाबदार असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह संबंधितांना निलंबित करण्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.