मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रकिनाऱ्यावर आज बुधवारी लाटांनी वाहून आलेला एक मृत डॉल्फिन मासा आढळून आला. सुमारे 8 फूट लांबीचा व 400 किलो वजनाचा हा डॉल्फिन कुजलेल्या अवस्थेत असल्याने वन विभागाने किनाऱ्यावरच दफन केले.
उत्तनच्या मोठागाव जवळील समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेतील डॉल्फिन मासा समुद्रातील लाटांसह वाहून आला होता. डॉल्फिनचा मृतदेह आढळल्याने स्थानिक कोळी बांधवांनी उत्तन सागरी पोलिसांना याची माहिती दिली. याची माहिती वन विभागाला कळाल्यावर दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत डॉल्फिनची पाहणी करून पंचनामा केला. डॉल्फिन कुजलेल्या अवस्थेतील असल्याने जेसीबीने किनाऱ्यावरच मोठा खड्डा करून त्यात डॉल्फिनचे दफन करण्यात आले.
भाईंदर पूर्व व पश्चिमेस देखील वसई खाडी किनारी डॉल्फिन सापडण्याचा दोन घटना घडल्या होत्या. सदर दोन्ही डॉल्फिन खाडीत आले होते आणि जिवंत होते. परंतु खाडीतील प्रदूषित पाणी वा अन्य कारणाने त्यांचा मृत्यू झाला होता. ते दोन्ही डॉल्फिन वनविभागास ताज्या अवस्थेत सापडले होते.