ठाणे : खिडकाळी भागातील खिडकाळेश्वर मंदिर तलावात बुधवारी सकाळी मृत माशांचा खच आढळून आला. हे मासे नेमके कोणत्या कारणामुळे मृत झाले आहेत, याची माहिती मात्र मिळू शकली नाही. परंतु, तलावातील फिल्टरेशन प्लान्ट बंद पडल्याने आणि पाण्यात केमिकल मिसळल्यानेच या माशांचा मृत्यू झाला असावा, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
ठाण्यातील मुंब्रा भागात खिडकाळेश्वर मंदिर मंदिर आहे, त्याठिकाणीच हा तलाव आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ मध्ये हा भाग येत असून बुधवारी सकाळी या तलावात असंख्य मासे मृत पडल्याचे निदर्शनास आले. तलावात हे मासे मृतावस्थेत तरंगतांना दिसले. या तलावात दशक्रिया विधी, अंघोळ करणे यासारखे प्रकार होत असतात. तसेच तलावाची साफसफाई करण्यात येत नसल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेने यावर वेळीच उपाययोजना न केल्यामुळे हा प्रकार घडल्याचाही आरोप परिसरातील स्थानिकांनी केला आहे.या तलावात प्रमाणापेक्षा जास्त मासे होते. त्यांचे वजनही जास्त आहे, शिवाय त्या तलावातील मासेही काढले जात नव्हते. त्यामुळे त्याचा कदाचित परिणाम झाला असावा. आता आम्ही येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. अहवाल आल्यानंतरच माशांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.- मनिषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण अधिकारी