भिवंडीः शहरातील दिवाणशा दर्गा परिसरांतील नालापार भागात मंगळवारी सायंकाळी हरविलेल्या मुलीचा मृतदेह बुधवारी सायंकाळी उघड्या नाल्यात सापडल्याने परिसरांत हळहळ व्यक्त केली जात आहे.कुलसुम समसुद्दीन अन्सारी असे मृत मुलीचे नाव असुन शहरातील भोईवाडा पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना साठी स्व.इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल केला आहे .नालापार येथील झकेरीया मस्जिद जवळ चाळीत कुलसुम ही मतीमंद मुलगी आपल्या आईवडीलांसह रहात होती.घराच्या परीसरात हातगाडी वर व्यवसाय करणा-या आपल्या वडीलांकडे खाऊ खाण्यासाठी पैसे घेण्यास कुलसुम ही मंगळवार रोजी सायंकाळी ७.३०वा.गेली आणि नेहमीप्रमाणे वडिलांकडून दोन रुपये घेऊन गेली. तासाभरानंतर वडील समसुद्दीन घरी आले असता कुलसुम घरी आली नसल्याचे समजले. कुटुंबीयांनी परीसरात शोधाशोध सुरु केली. पण ती कोठेच आढळुन न आल्याने कुटुंबीयांनी स्थानिक भोईवाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन कुलसुमच्या हरविल्याची खबर दिली. पोलिसांनी मंगळवार रात्री उशीरा मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल करीत सर्व परीसर पिंजुन काढला . परंतु तीचा कोठेच शोध न लागल्याने पोलिसांचे सहकार्य घेऊन नागरिकांनी बुधवारी सकाळपासून पासुन पुन्हा शोधाशोध सुरू केली. त्यातच पोलीसांनी परीसरात वहाणाऱ्या मोठ्या नाल्यास लक्ष करीत तेथे शोधण्यास सुरवात केली असता मुलीच्या घरापासुन एक किलोमिटर अंतरावर कुलसुमचा मृतदेह नाल्यात आढळुन आला.पोलीसांनी शव पाण्यातुन बाहेर काढून शवविच्छेदनासाठी इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. मुलीचा मृत्यु पाण्यात बुडुन झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय भिसे यांनी दिली. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
हरविलेल्या सात वर्षांच्या गतीमंद मुलीचा मृतदेह सापडला नाल्यात, परिसरात शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 2:54 AM