कल्याण : डोंबिवलीहून २० मिनिटांत ठाणे गाठण्यासाठी सोयीस्कर असलेल्या मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाचे काम आता जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची ग्वाही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिली आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली रिंग रोडच्या तिसºया टप्प्याचेही काम जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले आहे.मोठागाव-ठाकुर्ली खाडीपुलाच्या कामाची पाहणी मंगळवारी शिंदे यांनी केली. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनीता राणे, एमएमआरडीएचे अभियंता जयंत ढाणे, शिवेसना नगरसेवक दीपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, राजेश मोरे आदी उपस्थित होते.मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली, असा बोटीने प्रवास करून पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यापूर्वी अधिकाºयांसोबत घेतलेल्या बैठकीत शिंदे यांनी पुलाच्या कामाच्या स्थितीबाबत विचारले असता अधिकाºयांनी सांगितले की, पुलाच्या कामाची सुरुवात डोंबिवलीच्या दिशेने झालेली आहे. भिवंडीच्या दिशेने पुलाला पोहोच रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी हा पोहोच रस्ता उड्डाणपुलाच्या स्वरूपात होता. आता तो अंडरपास करण्यात आलेला आहे. भिवंडीच्या दिशेनेही खाडीत पिलर टाकण्याचे काम सुरू झालेले आहे. पुलाच्या कामासाठी ८० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पुलासाठी ६५ मीटर लांबीचे दोन गर्डर तयार करण्याचे काम सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये कामगार नसल्याने पुलाचे काम थांबले होते. मात्र, आता मजूर मिळण्यास सुरुवात झाली आहे.पुलाचे काम जोमाने सुरू करा, असे शिंदे यांनी अधिकाºयांना सांगितले. त्यावर पुलाचे काम जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण होईल, अशी ग्वाही अधिकाºयांनी दिली. कल्याण रिंग रोडच्या तिसºया टप्प्याचे कामही तातडीने सुरू करणे अपेक्षित आहे. हे कामही जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करा, असे खासदारांनी सांगितले. त्यावर ढाणे म्हणाले, तिसºया टप्प्याचे काम हे कल्याण-गोविंदवाडी बायपास ते मोठागाव ठाकुर्ली दरम्यान आहे. या टप्प्याची जवळपास ४०० कोटींची निविदा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काढली जाईल. त्यासाठी ६७ टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या रिंगरोडचे दुर्गाडी ते टिटवाळादरम्यानचे काम सुरू आहे. लॉकडाऊनमुळे या कामावर परिणाम झाला आहे. मात्र, आता ते काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.पुलावर २३३ कोटींचा खर्च : मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाच्या कामाला २०१६ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्याचे काम ३६ महिन्यांत म्हणजे मार्च २०१९ मध्ये पूर्ण होणेअपेक्षित होते. मात्र, आता पुन्हा डेडलाइन जानेवारी २०२२ पर्यंत वाढली आहे. या पुलाच्या कामासाठी २२३ कोटी २५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
खाडीवरील पुलाची डेडलाइन वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:54 AM