बदलापूर: बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याच्या अनुषंगाने पालिकेने आता कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काम सुरू करण्यात आले असून दहा ऑगस्ट पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. बदलापूर नगरपालिकेच्या वतीने गौरी हॉल येथे कोविड हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र त्याठिकाणी पालिकेसाठी काही राखीव बेड ठेवत ते काम एका खाजगी डॉक्टरला देण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यास शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी विरोध दर्शविताच आता बदलापूर पालिकेने गौरी हॉलमध्ये खाजगी डॉक्टरांची सुरू असलेले काम थांबले असून त्या डॉक्टरांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात येत आहे,तर दुसरीकडे गौरी हॉल पालिकेने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ऑक्सीजन यंत्रणा असलेले वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आपल्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने गौरी हॉलच्या सभागृहात ऑक्सीजन यंत्रणा असलेली सर्व यंत्रसामग्री बसविण्यात येत असून दहा ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी शंभर ते दीडशे बेड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केला जात आहे. यासोबतच सभागृहात एका मजल्यावर अतिदक्षता विभागाचे काम देखील करण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने देखील संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन ते काम देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यास त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
'' बदलापूर पालिकेच्यावतीने गौरी हॉल येथे सरासरी 400 बेडचे ऑक्सीजन कक्ष उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त बेड तयार करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे आणि ही सेवा लवकरात लवकर देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे - जगतसिंग गिरासे, प्रशासकीय अधिकारी, बदलापूर
'' बदलापुरात रुग्णांना मोफत कोरोनावर उपचार मिळावा यासाठी आमचा प्रयत्न होता. खाजगी संस्थेमार्फत रुग्णालय सुरू केल्यास त्याचा भुर्दंड नागरिकांवर पडण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिकेच्यावतीने रुग्णालय सुरू करण्यासाठी आम्ही आग्रही होतो. - वामन म्हात्रे, शिवसेवा शहर प्रमुख.