कल्याण : बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम २० वर्षांपासून रखडले आहे. याची दखल घेऊ न राज्य सरकारने एमआयडीसीला पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर धरणातील पाणीसाठा १३३ दशलक्ष घनमीटरने वाढणार आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्याच लागणार आहेत.एमआयडीसीने १९९८ मध्ये धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले होते. या धरण क्षेत्रातील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा अडथळा ठरत आहे. धरणाचे हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे एमआयडीसी सांगत आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तोंडली मोहघर, काचकोळी, कोळेवडखळ, सुकाळवाडी, मानिवली या गावांतील एक हजार १६३ जणांचे पुनर्वसन झाले आहे. त्यांच्यासाठी घर, शाळा, रस्ते या सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तसेच बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरी देण्यात येणार असून ४६७ जणांची यादी मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. तीन महिन्यांत प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंडवाटप व इतर सुविधा देण्याची कामे पूर्ण केली जाणार आहेत.बारवी धरणाची पाणीसाठ्याची क्षमता २०७.७९ दशलक्ष घनमीटर आहे. बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाल्यावर धरणाचा पाणीसाठा १३३.०७ दशलक्ष घनमीटरने वाढून एकूण क्षमता ३४० दशलक्ष घनमीटर होणार आहे.पाण्याच्या आरक्षणालाही मान्यताबारवी धरणाची पाणीसाठ्याची क्षमता १३३.०७ दशलक्ष घनमीटरने वाढणार असल्याने या वाढीव पाण्याचे आरक्षण सरकारने मान्य केले आहे. यापैकी १३.७० दशलक्ष घनमीटर पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, २३.५६ दशलक्ष घनमीटर पाणी केडीएमसीला, ८.४९ दशलक्ष घनमीटर पाणी स्टेम प्राधिकरणास, एमआयडीसीला ८७.९५ दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाणार आहे. स्टेम प्राधिकरणाद्वारे ठाण्याला, एमआयडीसीकडून उल्हासनगर, २७ गावे आणि नवी मुंबई, कळवा, ठाणे, मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे बदलापूर, अंबरनाथ विभागाला पाणीपुरवठा केला जातो. या भागातील नागरिकांना वाढीव पाणी जूननंतर मिळणार आहे.वाढीव पाणी २७ गावे की शहरी भागाला मिळणार?वाढीव २३ दशलक्ष घनमीटर पाणी कल्याण-डोंबिवलीसाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे हे पाणी महापालिका २७ गावांना देणार की, शहरी भागासाठी वापरणार, असा प्रश्न आहे. २७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. २७ गावांना एमआयडीसी आजमितीस दरदिवशी ३० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा करते. त्यामुळे एमआयडीसीला आरक्षित केलेल्या ८७.९५ दशलक्ष मीटर पाण्यापैकी किती पाणी २७ गावांना दिले जाईल, याविषयी अद्याप काही सुस्पष्टता नाही.
‘बारवी’च्या उंचीसाठी पावसाळ्यापर्यंत डेडलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 3:22 AM