कल्याण : डोंबिवलीतील व कल्याणमधील चार मोठ्या नाल्यांचा प्रवाह वळवण्याचे काम मे २०१७ पर्यंत तर प्रत्येक घर व सोसायटीचे चेंबर सांडपाणी प्रक्रिया केंद्राशी जोडण्याचे काम मे २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची महापालिकेने निश्चित केलेली डेडलाइन संपुष्टात आली आहे किंवा येत आहे. मात्र, तरीही कामे अद्याप झालेली नाहीत. ही कामे २०१९ ते २०२० पर्यंत रखडतील, अशी चिन्हे दिसत आहेत.उल्हास नदी व कल्याण खाडीत सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावरील प्रक्रियेप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा चाप लावल्याने एमआयडीसी व कारखानदार चांगलेच कामाला लागले असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून सांडपाणी प्रक्रिया केंद्रे पुरेशा क्षमतेनुसार चालवली जात नाहीत. अंतर्गत सांडपाण्याच्या वाहिन्या जोडण्याचे काम व तात्पुरत्या स्वरूपात नाल्यांचा प्रवाह सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवणे, या दोन्ही कामांची डेडलाइन महापालिकेने न्यायालयास सादर केली होती. या दोन्ही डेडलाइन पाळण्यात महापालिकेस अपयश आले आहे. नाला वळवण्याचे काम मे २०१९ पर्यंत, तर अंतर्गत सांडपाणी वाहिन्या जोडण्याचे काम पूर्ण होण्यास २०२० साल उजाडणार आहे.न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादाने घनकचरा व मलनि:सारण व्यवस्थापनावरून महापालिकेस चांगले फटकारले होते. महापालिकेच्या हद्दीत नाल्यातून वाहणारे सांडपाणी थेट उल्हास नदीला जाऊन मिळते. त्यावर प्रक्रिया करून ते पाणी कल्याण खाडी अथवा उल्हास नदीत सोडणे अपेक्षित आहे. महापालिकेकडे यापूर्वी पुरेशा क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नव्हते. महापालिकेने आधारवाडी येथे २५ दशलक्ष लीटर, बारावे येथे १५ दशलक्ष लीटर, टिटवाळा पूर्व-पश्चिमेत प्रत्येकी एक याप्रमाणे तीन दशलक्ष लीटर, चिंचपाडा येथे ४० दक्षलक्ष लीटर आणि मोठागाव ठाकुर्लीत ४० दशलक्ष लीटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. यापैकी मोठागाव ठाकुर्ली येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. उर्वरित पाच ठिकाणचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांची क्षमता १२३ दशलक्ष लीटर इतकी आहे. त्याठिकाणी केवळ ४० दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. क्षमता वाढली तरी पुरेसे सांडपाणी प्रकल्पात जात नाही. त्याचे कारण अंतर्गत सांडपाणी वाहिन्यांची जोडणी केंद्रास केलेली नाही. सांडपाणी व मलनि:सारण प्रक्रियेसाठी महापालिका मलनि:सारण व सांडपाणी सुविधा लाभकर आकारते. करवसुली होत असताना प्रकल्प उभारून प्रक्रिया करण्यात दिरंगाई का होत आहे, असा सवाल केला जात आहे. डोंबिवलीतील चार व कल्याणमधील चार मोठ्या नाल्यांचा प्रवाह वळवण्याचे काम मे २०१७ पर्यंत पूर्ण करण्याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या कामासाठी एक कोटी २५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. दोन महिन्यांपूर्वी या कामाचे कार्यादेश दिले गेले. याचा अर्थ मे २०१७ ची डेडलाइनच संपुष्टात आल्यानंतर १० महिन्यांनी हे काम सुरू झाले.आता मे २०१९ पर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. पावसाळ्यात हे काम बंद राहणार आहे. मलनि:सारण योजनेच्या पहिल्या टप्प्यात १३२ कोटींची योजना मंजूर आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक घर व सोसायटी चेंबर सांडपाणी प्रक्रिया केंद्राशी जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम मे २०१८ मध्ये पूर्ण करण्याची डेडलाइन होती. या कामाची मुदत तीन वर्षांची असल्याने हे काम २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.
डेडलाइन पे डेडलाइन हाच खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 3:13 AM