अंबरनाथ : तळोजा येथे शुक्रवारी रात्री लागलेली आग विझविण्यासाठी गेलेल्या अंबरनाथ एमआयडीसी अग्निशमन दलातील एका जवानाचा मृत्यू झाला. आग विझवताना अमोनिया वायूची बाधा झाली. शनिवारी दुपारी एमआयडीसी अग्निशमन केंद्रात त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
तळोजा एमआयडीसीमधील गांधी केम या कंपनीत शुक्रवारी रात्री आग लागली. या ठिकाणी रासायनिक द्रव्य मोठ्या प्रमाणात असल्याने ही आग झपाट्याने वाढली. त्याची माहिती मिळताच नवी मुंबई, सिडको, तळोजा एमआयडीसी आणि अंबरनाथ एमआयडीसी याच्यासह पसिरातील सर्वच अग्निशमन केंद्राचे जवान या ठिकाणी आग विझविण्यासाठी गेले होते. ही आग भयानक असली तरी अंबरनाथ एमआयडीसी अग्निशमन केंद्राचा जवान बाळू देशमुख याने आग विझविण्यात मोठी कामगिरी बजावली. मात्र ती विझवत असताना देशमुख यांना अनोनिया वायूची बाधा झाली.
श्वसनात अमोनिया वायू गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना लागलीच रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी पहाटे चार वाजता मृत्यू झाला. या मृत्यूमुळे अंबरनाथ एमआयडीसी अग्निशमन केंद्रातील कर्मचारीही मानसिक तणावाखाली आले आहेत. एक ३२ वर्षांचा जवान आपल्यातून निघून गेल्याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. देशमुख यांना चार वर्षांचा मुलगा असून त्यांची पत्नी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे.