नितीन पंडित
भिवंडी- शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाऊंड येथील तीन मजली जिलानी इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनाग्रस्त इमारतीत आपल्या जिवलगांच्या आठवणी आजही शोधत आहेत. याच ढिगाऱ्याच्या बाजूला जरीना अंसारी या दुर्घटनेत आपल्या वाचलेल्या मुलासोबत दिसल्या. या दुर्घटनेत त्यांनी आपली आई, बहीण व भावासह पोटाची मुलगी असे चार जण गमावले आहेत. मात्र या दुर्घटनेत त्यांच्या पंचवीस वर्षांचा मुलगा आलं तेवढा वाचल्याने त्यांनी अल्लाहचे आभार मानले मात्र परिवारातील चार जण गमावल्याचे दुःख त्यांना सतावत आहे.
आलम अंसारी वय वर्ष पंचवीस असे या दुर्घटनेत बचावलेल्या तरुणाचे व जरीना यांच्या मुलाचे नाव आहे. आलम हा ढिगाऱ्याखाली तब्बल नऊ तास अडकून होता. आपण वाचू की नाही याची पुसटशी कल्पना देखील आलमला नव्हती. ढिगाऱ्याची माती नका तोंडात गेल्याने त्याचा आवाज निघत नव्हता, मात्र बचाव पथकाने त्याला बाहेर काढल्यानंतर त्याने सुटकेचा श्वास घेतल्याचे आलम सांगत होता.
जरीना अंसारी पटेल कंपाउंडच्या पुढे असलेल्या टेकडीवर राहत असल्याने आलम व त्यांची अकरा वर्षांची छोटी मुलगी अफसाना अंसारी ही आपल्या आजी व मामाच्या घरी जिलानी इमारतीत राहत होती. रात्री आकरा वाजता जरीना आपल्या आईशी फोनवर बोलल्या होत्या आणि त्याच रात्री पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत त्यांची आई नाजमा मुरादअली कंकाली ( वय 55 वर्ष ), बहीण नाजीया मुरादअली कंकाली ( वय 24 वर्ष ), भाऊ इस्लाम मुरादअली कंकाली ( वय 32 वर्ष ), मुलगी अफसाना आलम अंसारी ( वय 11 वर्ष ) अशी चार जण मृत्युमुखी पडली आहेत. गुरुवारी त्या आई, बहीण, भाऊ व मुलीच्या आठवणीने कासावीस झाल्याने दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ ढसाढसा रडत बसल्या होत्या.