कल्याण : अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या गोविंदवाडी बायपास रस्त्याचे उद्घाटन होण्यापूर्वीच त्याचा वापर वाहनचालकांनी सुरू केला आहे. या नव्या रस्त्यावर एका चालकाचा मृत्यू झाला आहे. या रस्त्याच्या बांधकामात त्रुटी असून त्या दूर केल्याशिवाय तो खुला करू नये, अशी मागणी ‘मागमी उमंग’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अब्दुल गफ्फार शेख यांनी महापालिका आयुक्त व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. शहरातील कोंडी सोडवण्यासाठी पत्रीपूल ते दुर्गाडी हा गोविंदवाडी बायपास रस्ता एमएसआरडीसीने एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार केला आहे. या रस्त्याची मागणी ११ वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. २०११ मध्ये एमएमआरडीएने रेलकॉन कंपनीला या रस्त्याचे १५ कोटींना कंत्राट दिले. रस्त्याच्या दुर्गाडीच्या बाजूला असलेल्या गोठ्याच्या मालकामुळे हा रस्ता रखडला. न्यायालयाच्या आदेशानुसार गोठामालकाला त्याच्या बाधित जागेच्या बदल्यात जागा देण्यास महापालिकेने तयारी दाखवली. मात्र, त्याचा ताबाच त्याला दिलेला नाही, अशी बाब गोठामालक व माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ७ जानेवारीला होणारे रस्त्याचे लोकार्पण टळले. (प्रतिनिधी)
गोविंदवाडी बायपासवर एकाचा मृत्यू
By admin | Published: January 10, 2017 6:26 AM