मीरारोड - भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात वेळीच उपचार न केले गेल्याने एकाचा झालेल्या मृत्युप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. त्यासाठी संबंधितांचे जाबजबाब नोंदवले जात आहेत.सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी रुग्णालयात पाहणी साठी आले असता त्या महिलेस देखील आणण्यात आले होते. मीरारोडच्या पेणकरपाडय़ात राहणाऱ्या महिलेने सांगितले की, माझे 55 वर्षिय पतीला दोन दिवसा पासून बरे वाटत नव्हते. कोरोनाचा संशय असल्याने त्यांना शुक्रवारी रात्री रुग्णवाहिकेतून भाईंदरच्या टेंबा रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु शनिवारी सकाळी मी आले असता पती बाहेरच उघड्यावर आढळून आले. त्यांच्या चेहऱ्यावर मच्छर चावले होते व पावसात भिजले होते. तोंडातून फेस येत होता.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितले असता त्यांनी मद्यपान केले असून दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा असे सांगितले. तेथून त्या रुग्णास घेऊन मीरारोडला खासगी रुग्णालयात गेल्या असता तेथे २ लाख अनामत रक्कम भरा असे सांगण्यात आले . त्यामुळे त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले. जोशी रुग्णालयातील कमर्चारी व डॉक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिने केला होता . प्रभाग समितीची स्वीकृत सदस्य सोमनाथ पवार यांनीच पालिका परिचारिकेस कळवून रुग्णवाहिका मागवली होती. त्यातूनच रुग्णास जोशी रुग्णालयात नेले होते. त्यांना दाखल करून घ्यायचे नव्हते तर त्याच्या पत्नीस वा मला कळवले असते तरी दुसरी कडे उपचारासाठी नेले असते व त्यांचा प्राण वाचला असता. आपण आयुक्तांना तक्रार केल्याचे पवार यांनी सांगितले . दरम्यान या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्या नुसार जोशी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ . बाळासाहेब अरसुलकर यांनी चौकशी सुरु केली आहे.