ठाणे : येथील वर्तक नगर भागात असलेल्या वेंदात हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन अभावी चार जणांचा मृत्यु झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांना केला होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल आता समोर आला असून त्या चार रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजन अभावी झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.वर्तक नगर भागातील वेदांत हॉस्पीटलमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. परंतु या चौघांचे मृत्यु ऑक्सीजन अभावीच झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे रुग्णालय प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाहणी करुन या प्रकरणाच सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार भिवंडी महापालिकेचे आयुक्त पंकज आशिया हे चौकशी समितीचे अध्यक्ष असून, शिवाजी पाटील (निवासी उपजिल्हाधिकारी), डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणो), संदीप माळवी (उपायुक्त - ठामपा), डॉ. वैजयंती देवगीकर (वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा), मंदार महाजर (बायोमेडीकल इंजिनिअर - ठामपा) हे सदस्य म्हणून असणार आहेत. या समितीने सोमवारी सांयकाळी उशिरा रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानुसार येथे एकूण किती मृत्यू झाले, मृतांची नावे, वय, कोविड आजाराबाबत व रुग्णाच्या आरोग्य विषयक स्थितीची इतर आवश्यक माहिती गोळा करण्यात आली. तसेच मृत्यू एकाच वेळेस झाला की वेगवेगळ्या वेळेत झाला याची माहितीही घेतली गेली. मृत्यूंची कारणं आणि मृत्यूची वेळ या रुग्णांचा मृत्यु ऑक्सीजन पुरवठ्याशी काही संबंध आहे का?, याची देखील सविस्तर माहिती घेण्यात आली. विशेष म्हणजे या ठिकाणी ऑक्सीजनवर असलेल्या इतर रुग्णांशी देखील या समितीमधील सदस्यांनी चर्चा केल्याची माहिती देखील समोर येत आहे.त्यानुसार या चारही रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजन अभावी झाला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांचा मृत्यु झाला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तसेच, प्रत्येक रुग्णाचा मृत्यूची वेळ ही वेगवेगळी असल्याचेही पाहणीत समोर आले आहे. त्यातही येथे उपचारार्थ अन्य रुग्ण असून ऑक्सीजन नसते तर त्यांना देखील याचा फटका बसला पाहिजे होता, परंतु तसे काहीच निदर्शनास आलेले नाही. त्यामुळेच त्या चार रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सीजन अभावी झाला नसल्याचे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.हलगर्जीपणा नाहीया रुग्णालयातील चार जणांचा मृत्यू हा ऑक्सीजन अभावी झालेला नाही, तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारची वैद्यकीय हलगर्जीपणा देखील झालेला नाही. ज्या रुग्णांचे मृत्यु झाले, त्यांची प्रकृत्ती खालावली असल्यानेच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु रुग्णालयाने ज्या ज्या वेळेत रुग्णांचे मृत्यू झाले होते, त्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना देणे अपेक्षित होते. तसे न केल्याने काहीसा गोंधळ झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे यापुढे कोविड रुग्णालयांनी रुग्णाची प्रत्येक माहिती वेळोवेळी रुग्णांच्या नातेवाईकांना देणो बंधनकारक करण्यात आले आहे.राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे
ठाणे : 'त्या' रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजनअभावी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 3:47 PM
प्रकृती चिंताजनक असल्यानेच मृत्यू, चौकशी समितीचा अहवाल सादर
ठळक मुद्देप्रकृती चिंताजनक असल्यानेच मृत्यू, चौकशी समितीचा अहवाल सादरयापूर्वी नेमण्यात आली होती एक समिती