- राजेश भांगे टाेकावडे : प्रगतीच्या गप्पा मारत असताना मुरबाड तालुक्यातील साखरे सराईवाडीतील नागरिक स्वातंत्र्याची ७० वर्षे उलटूनही रस्त्याअभावी वाटेतच जीव साेडत आहेत. मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी झाडेझुडुपे तुडवत काट्या-कुट्यातून एक किलाेमीटरपर्यंत कच्च्या पायवाटेवरून जावे लागत आहे. माेटारसायकल जाईल, एवढाही रस्ता नसल्यामुळे आजारी व्यक्ती किंवा गर्भवती महिलांना डाेलीतून न्यावे लागत आहे. मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास नवसू धाकू सराई (वय ७०) यांना रुग्णालयात नेत असताना, त्यांचा रस्त्यात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
नवसू सराई यांची अचानक प्रकृती बिघडली. रस्ता नसल्यामुळे घरापर्यंत गाडी येत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी डाेलीतून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. मुख्य रस्त्यावर पाेहाेचेपर्यंत वाटेतच नवसू यांचा मृत्यू झाला. रस्त्याअभावी रुग्णालयात वेळेत पाेहाेचू न शकल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आराेप नातेवाइक व ग्रामस्थांनी केला आहे. काॅम्प्युटर युगात जगत असताना गावाला रस्ता नसल्याने अद्याप अश्मयुगातच जगत आहाेत की काय, असा भास हाेत असल्याची खंत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. या गावात ३२ कुटुंबे राहत असून, त्यांना रस्ता आणि पाणी यांसारख्या मूलभूत समस्या भेडसावत आहेत.
स्थानिक प्रशासन आणि लाेकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या मरणयातना सहन कराव्या लागत असल्याचा आराेपही त्यांनी केला आहे. रस्ता नसल्यामुळे आमची तिसरी पिढी मरणयातना भोगत आहे. आमच्या नातेवाइकांचे रस्त्याअभावी जीव जाताना डाेळ्यांनी पाहावे लागत असल्याचे ग्रामस्थ अशाेक सराई यांनी सांगितले. तीन वर्षांपूर्वी पार्वतीबाई महादू सराई व धर्मा पागो सराई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला हाेता. नवसू सराई हे तिसरे बळी ठरले, तसेच महादू सराई हे माेटारसायकलवरून पडून अपंग झाले हाेते, असे त्यांनी सांगितले.
साखरे सराईवाडीसाठी पूर्वी रस्ता हाेता. मात्र, ताे खासगी जागेतून जात असल्यामुळे फार्महाउस मालकाने ताे बंद केला आहे. त्याने ही जागा विकत घेतली आहे. हे प्रकरण तहसीलदारांकडे सुनावणीसाठी आहे. - ज्याेती गाेंधळी (भाेपी), ग्रामसेविका, साखरे ग्रामपंचायत.