अंबरनाथ : घराशेजारी असलेल्या शौचालयाच्या वादातून एका तरुणाने दुस-या तरुणाची चाकूने वार करून हत्या केली. यापूर्वीदेखील त्यांच्यात वाद झाले होते. ज्या तरुणाची हत्या झाली, तो नुकताच परदेशातून सुटीवर घरी आला होता आणि दोनच दिवसांनी परदेशी जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच ही दुर्घटना घडल्याने अंबरनाथच्या उलनचाळ परिसरात वातावरण तंग झाले आहे.रिजवान अब्बास शेख (२७) हा मूळचा उलनचाळ येथे राहणारा तरुण कामानिमित्त परदेशात असतो. त्याचा विवाह निश्चित झाल्याने त्यासाठी तो कामावरून सुटी घेऊन अंबरनाथमध्ये आला होता. पुन्हा लग्नासाठी घरी यावे लागणार असल्याने दोन दिवसांत तो पुन्हा परदेशात कामानिमित्त जाणार होता. मात्र, बुधवारी सायंकाळी रिजवान आणि त्याच्याशेजारी राहणाºया खालीद सय्यद यांच्यात शौचालयाच्या वादातून भांडण झाले. याआधीदेखील त्यांच्यात वाद झाला होता. मात्र, हा वाद जीवघेणा ठरेल, असे रिजवानला कधी वाटलेदेखील नव्हते. बुधवारी रिजवान आणि खालीद यांच्यात वाद झाल्यावर खालीदने रिजवानच्या डोक्यात पेव्हरब्लॉक मारून त्याला जखमी केले. रिजवान खाली पडल्यावर त्याच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार करून खालीद पळून गेला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रिजवानला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर, उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू ओढावला. या हत्येनंतर पोलिसांनी खालीदविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
शौचालयाच्या वादातून तरुणाची हत्या, दोन दिवसांनी जाणार होता परदेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 2:11 AM