मुंबई - राज्यातील समृद्धी महामार्गावरीलअपघातांची मालिका अद्यापही सुरूच आहे. या ना त्या कारणाने समृद्धी महामार्ग सुरू होण्याअगोदरपासूनच चर्चेत आहे. मात्र, या महामार्गावील अपघात ही गंभीर बाब बनली आहे. गेल्याच महिन्यात समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा स्फोट होऊन २५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील शहापूर येथे भीषण दुर्घटना घडली आहे. येथील पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळून मोठा अपघात झाला. त्यात, १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकजण जखमी आहेत.
शहापूरजनिक पुलावरील काम सुरू असताना ग्रेडर मशिन कोसळल्याने अपघात झाला. त्यामध्ये, १७ कामगारांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री सरलांबेजवळ ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, अपघातस्थळी भेट देत पाहणीही केली. घटनास्थळावरुन आत्तापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून डॉग स्कॉड पथकासह अद्यापही कामगारांचा शोध घेण्यात येत आहे. एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी रात्री १ वाजताच मला फोन करुन अपघातासंदर्भातील माहिती देत आदेश दिले. त्यानुसार, ताबतडतोब आम्ही सर्वजण टीमसह घटनास्थळी पोहोचलो. तसेच, २० ते २५ मिनिटांत घटनास्थळी मदतकार्याला सुरूवात झाली होती, असे दादा भुसेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.