कल्याण : गोंविदवाडी बायपासचे काम पूर्ण होण्याअगोदरच या रस्त्यावर पाच ते सहा जणांचे बळी गेले असताना बुधवारी पुन्हा याच रस्त्यावर एका भरधाव रेतीच्या ट्रकने १६ वर्षीय मुलाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करून ट्रकचालकाला कडक शिक्षा करण्याची मागणी लावून धरली. हा रस्ता अरूंद आहे. त्यावर चार शाळा आहेत, तरीही हप्ता घेऊन तेथून भरधाव वेगाने रेतीचे ट्रक जाऊ दिले जातात, त्याचा पुरावा या दुर्घटनेमुळे मिळाला.गोविंदवाडी येथे राहणारे माजिद टेलर यांचा मुलगा बिलाल चौधरी (वय १६) हा स्कुटीवरून बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास गोविंदवाडी बायपासने जात असताना तो रेतीच्या ट्रकच्या डाव्या बाजुच्या चाकाखाली चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. बिलाल हा मोहिंदरसिंग काबुलसिंग हायस्कूलमध्ये अकरावीत शिकत होता. बिलाल हा त्यांचा एकुलता एक मुलगा असून त्याला दोन लहान बहिणी आहेत. तो मित्रांसह स्कूटीवरून परीक्षा देऊन घरी परतत असताना हा झाला. त्यानंतर ट्रकचालक फरार झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. बाजारपेठ पोलिसांनी पंचनामा करून मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पालिकेच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवला. ट्रकचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रक जप्त केला. फरार चालकाचा शोध सुरु आहे.या परिसरात नॅशनल उर्दू स्कूल, अल्फा इंग्लिश स्कूल, ओल्ड बॉइज स्कूल आणि मोहमाद्दिया इंग्लिश स्कूल अशा चार मोठ्या शाळा आहेत. त्यात हजारो विद्यार्थी शिकतात. याच परिसरात खाडीतून रेती उपसण्याचा बेकायदा व्यवसायही जोरात सुरु असतो. त्यामुळे दररोज या ठिकाणांहून रेती वाहून नेणाऱ्या ट्रकची मोठी वाहतूक असते. हा रस्ता चिंचोळा असून रेतीचा ट्रक या रस्त्यावर आल्यास वाहतुकीची कोंडी होते, असे स्थानिकांनी सांगितले. याठिकाणी सुरु असणाऱ्या रेती व्यवसायाकडे पोलीस आणि प्रशासन कानाडोळा करते. प्रत्येक ट्रकच्या एन्ट्रीसाठी १०० त २०० रूपयांची चिरीमिरी घेऊन बेकायदा रेती उपसा करणाऱ्या ट्रकला खुलेआम सोडले. जाते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)रस्त्याने घेतला वृद्धाचा बळीकल्याण : कल्याण-डोंबिवलीतील सिमेंट काँक्रि टीकरणाच्या कामांच्या संथगतीने नागरिक त्रस्त असतानाच या अरूंद रस्त्यात पडून ट्रकखाली चिरडल्याने एका वृद्धाचा बळी गेला. आधारवाडी परिसरात ही दुर्घटना घडली. अनंत गोविंद पाटील (६४, रा. उंबार्डे) असे त्यांचे नाव आहे. जेल रोड ते आधारवाडी चौक परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. अनेक ठिकाणी हा रस्ता खोदण्यात आला आहे. काम संथगतीने सुरु आहे. संबंधित कंत्राटदाराने सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केलेल्या नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे. अनेक दुचाकी, लहान गाड्या, मोठे ट्रक, ट्रेलरचीही येथून वाहतूक सुरु असते. जेलकडून आधारवाडीकडे येणारा मार्ग चिंचोळा आहे. वाहनचालकांना कसरत करत गाडी चालवावी लागते. उंबर्डे येथील पाटील या मार्गावरून सायकलवरू न जात असताना मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकचा धक्का लागून खाली पडले आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.
ट्रकच्या धडकेत मुलाचा मृत्यू
By admin | Published: March 16, 2017 2:57 AM