अंबरनाथ : इमारतीच्या सेंटरिंगचे काम सुरू असताना लोखंडी जॅक कामगाराच्या डोक्यावर आदळल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा दाखविणाऱ्या बिल्डर, इंजिनिअर व लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ (पूर्व) येथील पालेगाव परिसरात पटेल हिल्स या कंपनीचे गृहसंकुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सतराम पुजारी वर्मा (३४) हा कामगार काम करीत होता. १ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता तो पिण्यासाठी एका बाटलीमध्ये पाणी घेऊन येत होता. त्याचवेळी इमारतीच्या १२ व्या मजल्यावर सेंटरिंगचे काम सुरू असताना लोखंडी जॅक सतरामच्या डोक्यावर पडला. या दुर्घटनेत सतराम गंभीररीत्या जखमी झाला. त्याला उल्हासनगरच्या दाखल केले असता उपचारादरम्यान सतरामचा मृत्यू झाला.
याप्रकरणी बिल्डर व इतरांनी हलगर्जीपणा दाखविल्यानेच सतरामचा मृत्यू झाला, असा आरोप सतरामचा मेव्हणा भाईलाल पटेश्वरी वर्मा (४५) याने केला होता. त्याचप्रमाणे आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची मागणी केली होती. या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलिसांनी सुरू केला व तपासात सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही कुंपण अथवा संरक्षक जाळी आरोपी रमेश पटेल, इंजिनिअर हबन वर्मा व लेबर कॉन्ट्रॅक्टर कल्पेश हप्पानी यांनी बसविली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर शनिवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. बी भोयर करीत आहेत.