भिवंडी : काल्हेर येथील वडीलोपार्जीत मालमत्तेच्या वादातून रात्री सव्वीस वर्षाच्या युवकाची निर्घुण हत्या झाल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.तर गेल्या वर्षापासून नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू झालेले निर्घुण हत्यासत्र दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.पंकज प्रकाश म्हात्रे(२६)असे हत्या झालेल्या युवकाचे नांव असुन तो काल रात्री आपल्या मित्रांसोबत काल्हेर येथील प्रिन्स इंटरप्रायझेसच्या कार्यालयांत नेहमीप्रमाणे कॅरम खेळत बसला होता. या वेळी तेथे त्याचा चुलत भाऊ मोगेश म्हात्रे आपल्या साथीदारांसह आला आणि त्याने आपल्या घरावर कबुतराने घाण केल्याचे शुल्लक कारण काढून पंकज म्हात्रे बरोबर वादास सुरूवात केली. त्या वादातून धारदार चाकू पंकजच्या छातीत खुपसल्याने पंकजच्या छातीतून भळभळा रक्त वाहून गेल्याने त्याच्यावर रूग्णालयांत उपचार होण्यापुर्वीच त्याचा मृत्यु झाला. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी मोगेश म्हात्रे व अभिषेक जोशी या दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.त्यापैकी अभिषेक जोशीला पोलीसांनी अटक केली आहे.तालुक्यातील काल्हेरमध्ये एकमेका शेजारी रहाणाºया पंकज प्रकाश म्हात्रे व त्याचा चुलत भाऊ मोगेश म्हात्रे यांच्या मध्ये वडीलोपार्जीत मालमत्ते संदर्भात गेल्या काही वर्षापासून वाद सुरू आहेत.त्यामुळे या दोन्ही कुटूंबामध्ये वाद धुमसत होता.त्या वादातून ही हत्या झाली,अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.गेल्या वर्षी १४ एप्रिल २०१७ रोजी महानगरपालिकेतील काँग्रसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची निर्घुण हत्या झाल्यानंतर नारपोली पोलीस ठाण्याअंतर्गत निर्घुण हत्येचे प्रमाण वाढत आहेत.या हत्येने हा गंभीर विषय चर्चेला आणून परिसरांतील लोकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
---------