कल्याण : केडीएमसीची अर्थसंकल्पीय महासभा बुधवारी प्रभागनिहाय अर्थसंकल्प सादर करण्याच्या मागणीवरून चांगलीच गाजली. सुधारित अर्थसंकल्पाला मान्यता देताना प्रभागनिहाय खर्च आणि उत्पन्नाची माहिती द्या, या मागणीवरून सेना सत्ताधाऱ्यांमध्येच वाद झाला. या वेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांना टार्गेट केल्याने स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे हेही संतप्त झाले. दरम्यान, बहुचर्चेनंतर अर्थसंकल्प सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिलेल्या उपसूचनांसह मंजूर करण्यात आला. शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी प्रभागनिहाय खर्च आणि उत्पन्नाची माहिती सभागृहात सादर करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली. वास्तविकपणे प्रभागनिहाय अर्थसंकल्पच सादर होणे आवश्यक असल्याकडे शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनीही लक्ष वेधले. जोपर्यंत माहिती मिळत नाही, तोपर्यंत चर्चा करायची नाही, असा पवित्रा दोघांनी घेतला. देवळेकर यांनी सध्या एकत्रितपणे अर्थसंकल्प मांडला असून प्रभागनिहाय माहिती मिळणार नाही, असे स्पष्ट केले. आमचा आवाज दाबू नका, प्रशासनाची बाजू घेऊ नका, अशा शब्दांत सुनावत शेट्टी यांनी आपली मागणी सुरूच ठेवली. वामन म्हात्रे, वैजयंती घोलप - गुजर यांनीही या विषयावर आक्रमक पवित्रा घेतला. अधिकाऱ्यांची बाजू घेऊ नका, मला बोलू द्या, असे महापौरांना सुनावताना वामन म्हात्रे यांना भावना अनावर झाल्या. अखेर, घोलप यांनी त्यांना शांत केले. (प्रतिनिधी)स्वपक्षीयांचाच गोंधळएकीकडे देवळेकर यांना स्वपक्षातील नगरसेवकांच्या आक्रमकतेला तोंड द्यावे लागत असताना दुसरीकडे सभापती म्हात्रे हे संतप्त झाले. शिवसेना नगरसेवकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले भाजपा नगरसेवक राजन सामंत यांना देखील म्हात्रेंनी आग लावू नका, असे सुनावले.
केडीएमसीत सत्ताधाऱ्यांमध्येच वाद
By admin | Published: March 30, 2017 6:37 AM