डोंबिवली: केडीएमसीच्या येथील विभागीय कार्यालयात आधारकार्ड मिळण्याची व्यवस्था नागरीकांसाठी उपलब्ध करून दिली असताना आता नोंदणी (टोकण)कुठे करायची यावरून वाद सुरू झाला आहे. आधार केंद्रावर गर्दी होत असल्याने याची नोंदणी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे सावरकर रोडवरील जाणता राजा कार्यालयात करण्याच्या सूचना केंद्रचालकाकडून करण्यात आली आहे. याला आरटीआय कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी हरकत घेत नोंदणी एखादया राजकीय (भाजपच्या) पक्षाच्या कार्यालयात का? असा सवाल केला आहे. दरम्यान या वादावर केंद्रचालक कैलास डोंगरे यांनी नोंदणीसाठी निंबाळकर यांच्याशी संपर्क साधावा असे फलक केंद्राबाहेर लावल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादात नागरीक वेठीला धरले गेलेच त्याचबरोबर हे केंद्र बंद पडण्याच्या वाटेवर आहे.महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील वाचनालयाच्या जागेत राज्यमंत्री चव्हाण यांच्या पुढाकाराने कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरात अन्यत्र कुठेही हे केंद्र नाही. एकमेव के ंद्र असल्याने आधारकार्डासाठी याठिकाणी मध्यरात्रीपासूनच नागरीकांच्या रांगा लागतात. परंतू तीन युनिटपैकी केवळ दोन युनिटच सध्या चालू आहेत. रांगा लावूनही नंबर लागत नसल्याने नागरीकांची पुरती परवड झाली आहे. दरम्यान केंद्रावर वाढती गर्दी आणि मध्यरात्रीपासून बाहेर लागत असलेल्या रांगा पाहता सुरक्षेच्या अनुषंगाने केंद्रचालक डोंगरे यांनी नवीन आधार नोंदणी व सुधारीत आधार कार्डसाठी टोकण हे सावरकररोडवरील जाणता राजा कार्यालयात सायंकाळी ४ ते ५ यावेळेत मिळेल असे फलक केंद्राबाहेर लावले होते. आधार केंद्रावर नोंदणीची चौकशी करू नये अशी टिप ही त्यात देण्यात आली आहे. मात्र याला आरटीआय कार्यकर्ते निंबाळकर यांनी हरकत घेतली. आधारकार्ड देण्याचा कार्यक्रम शासकीय असताना भाजपाच्या कार्यालयात नोंदणी कशासाठी असा सवाल केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल करताच केंद्र चालक डोंगरे यांनीही केंद्राबाहेर फलक लावून नोंदणीसाठी आरटीआय कार्यकर्ते निंबाळकर यांच्याशी संपर्क साधावा असा फलक केंद्राबाहेर लावून टाकला. निंबाळकरांच्या दिलेल्या पत्त्यावरून नागरीक त्यांच्याकडे जाऊ लागले याचा राग त्यांना आला. त्यांनी बुधवारी दुपारी थेट विभागीय कार्यालय गाठून डोंगरे यांना लावलेल्या फलकाबाबत जाब विचारला. केंद्रावर मनुष्यबळाची कमतरता आणि सुरक्षेचा अभाव असल्याने नागरीकांची कशी परवड होते याकडे त्यांनी निंबाळकरांचे लक्ष वेधले. परंतू शासनाचा उपक्रम राजकीय पक्षाच्या कार्यालयात का? या मुद्यावर निंबाळकर ठाम राहीले. यावेळी दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. अखेर निंबाळकरांच्या नावाने लावलेला फलक काढून टाकण्यात आल्यावर वादावर पडदा पडला. दरम्यान महापालिकेच्या विभागीय कार्यालात कोणतीही सुविधा नाही तर सुरक्षा देखील पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्रावरील गर्दीतून जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवला तर याला जबाबदार कोण? असा सवाल डोंगरे यांनी केला असून त्यापेक्षा केंद्र बंद केलेले मला परवडेल अशी भुमिका त्यांनी बोलुन दाखविल्याने आधारकार्ड केंद्राच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात विभागीय कार्यालयातील ग प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
नोंदणी कुठे करायची यावरून उदभवला वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 8:21 PM
डोंबिवली: केडीएमसीच्या येथील विभागीय कार्यालयात आधारकार्ड मिळण्याची व्यवस्था नागरीकांसाठी उपलब्ध करून दिली असताना आता नोंदणी (टोकण)कुठे करायची यावरून वाद सुरू झाला आहे. आधार केंद्रावर गर्दी होत असल्याने याची नोंदणी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे सावरकर रोडवरील जाणता राजा कार्यालयात करण्याच्या सूचना केंद्रचालकाकडून करण्यात आली आहे. याला आरटीआय कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी ...
ठळक मुद्देनागरीक वेठीला: आधारकार्डसाठी परवड कायमएकमेव केंद्र बंद पडण्याच्या वाटेवर