ठाणे : दहा लाखांच्या व्यावसायिक कर्जाचे हप्ते थकविल्यामुळे व्यावसायिकाच्या पत्नीलाच उचलून नेण्याची धमकी दिल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत. यासंदर्भात मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला असून, हे मोगलांचे सरकार आहे का, असा सवाल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करण्यात आले आहे.
लोकमान्यनगर येथील रहिवासी प्रशांत पांचाळ (वय ४२) यांनी एका खासगी वित्तीय संस्थेकडून दहा लाखांचे व्यावसायिक कर्ज घेतले आहे. यातील पाच लाखांची रक्कमही त्यांनी आतापर्यंत भरली आहे. कोरोनामुळे सुरू असलेले लॉकडाऊन तसेच त्यांना स्वत:लाही कोरोनाची बाधा झाल्यामुळे काही हप्ते ते भरू शकले नाहीत. परंतु, मेंन्टीफी फायनान्स कंपनीच्या राज शुक्ला या प्रतिनिधीने १५ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना हप्त्याच्या वसुलीसाठी फोन केला. तेव्हा पांचाळ यांनी डिपॉझिटमधून हप्ता कपात करा, असे त्यांना सांगितले. याचाच राग आल्याने पांचाळ यांना त्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या पत्नीला उचलून नेण्याचीच धमकी दिली. दरम्यान, पांचाळ यांच्या घरी शुक्ला यांच्या सांगण्यावरून सुरेश नामक वसुली प्रतिनिधी २८ एप्रिल रोजी आला होता. परंतु, मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पांचाळ यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात धमकी देणे, शिवीगाळ कलम ५०७ नुसार बुधवारी तक्रार दाखल केली.
* ‘लोकमत’ची भूमिका
सध्या लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद आहेत. अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. काहींचे वेतनच कपात झाले आहे. अशा वेळी ज्यांनी व्यवसायासाठी कर्ज काढले, त्यांना कर्जाचे हप्ते भरणेही शक्य होत नाही. खासगी वित्तीय कंपनीच्या वसुली प्रतिनिधीने अशा प्रकारे एखाद्याच्या पत्नीला उचलून नेण्याची धमकी देणे बेकायदेशीर आहे. शिवाय अशा आरोपींवर विनयभंगासह कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अन्यथा असे अनेक प्रकार घडण्याचीही भीती आहे.
............जोड आहे.