राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लॉकडाऊन काळात अत्यावश्यक भाजी मार्केट, फळमार्केट, मसाला, धान्य मार्केट, कांदा-बटाटा मार्केट तसेच मच्छी मार्केट यांना योग्य ती खबरदारी घेत विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्वच मार्केटमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नौपाडा येथील मुख्य भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी तसेच योग्य ती खबरदारी घेत नागरिकांना खरेदी करता यावी यासाठी भाजी मार्केटचे तलावपाळी येथे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. तलावपाळी येथे नागरिकांना गर्दी न करता भाजी खरेदी करता यावी याकरिता योग्य ते मार्किंग करून ठरावीक अंतराने विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा तयार करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास २४८ भाजी विक्रेते असून, २५२ विक्रेत्यांना मार्किंग करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजीमार्केट, फळमार्केट, धान्य मार्केट, कांदा-बटाटा मार्केट तसेच मच्छी मार्केट आदी ठिकाणच्या सर्व विक्रेत्यांची अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ३०० जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सोमवारी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सदर भाजी मार्केटच्या मार्किंग तसेच विक्रेत्यांच्या अँटिजेन चाचणीची पाहणी केली, यावेळी उपआयुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.