लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आहे आणि ज्या अकरावी प्रवेशाची चिंता होती, तेही वैकल्पिक सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेऊन दिले जाणार, हे सरकारने घेतलेले दोन्ही निर्णय परिस्थितीनिहाय योग्यच आहेत; पण तितकेसे परिपूर्णही नाहीत. आता त्याची नेमकी अंमलबजावणी कशी होते, कधी होते, त्याबाबतच्या निर्णयात जास्त काळ जाता कामा नये, असे संमिश्र सूर उमटले आहेत ते ठाण्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्थाचालकांमधून. दहावीचा निकाल आणि अकरावीचे प्रवेश याबाबतचे धोरण ठरवून त्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने आधीच जाहीर केला आहे. मात्र, दहावीचा निकाल आणि अकरावीचे प्रवेश कोणत्या निकषांवर करणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्याबाबत सर्वसमावेशक असे धोरण तयार करण्यासाठी विविध बैठका घेतल्या गेल्या आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदानाबाबत धोरण ठरवले. शुक्रवारी याची माहिती दिली गेली. कोरोनाकाळात आपल्या सुरक्षिततेपेक्षा दुसरे काहीही मुलांना आणि त्यांच्या पालकांना महत्त्वाचे वाटत नाही. या पार्श्वभूमीवर या निर्णयाबाबत अनेक विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच काही शिक्षकांनी हा निर्णय योग्य आहे, असे म्हटले असले तरी काहींनी मात्र हा निर्णय अधिक परिपूर्ण हवा होता, असेही मत व्यक्त केले आहे. तर संस्थाचालकांनी हा निर्णय योग्य असून सीईटी कशा रीतीने घेतात ते पाहावे लागेल, असे म्हटले आहे.
----------
यंदा आरोग्य महत्त्वाचे असल्याने परीक्षेचा निकाल जो येईल तो मान्य असेल; पण आता प्रवेश परीक्षा कशी घेतात, त्याचे मूल्यांकन कसे करतात, हे बघावे लागेल. त्यात जास्त काळ गेला तर पुन्हा प्रवेशाला विलंब होईल.
- संकिर्णा बर्वे, विद्यार्थिनी
----------
परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे; पण ९ वीच्या गुणांचाही आधार दहावीच्या अंतिम निकालात घेतला तर त्याचा परिणाम टक्केवारीवर नक्कीच होईल. दहावीला आम्ही जास्त अभ्यास केला होता. पुन्हा प्रवेश परीक्षा कशी घेणार, हेपण शासनाने स्पष्ट करायला हवे होते.
- ओमकार दवे, विद्यार्थी
-------------
शासनाने दहावीचा निकाल आणि प्रवेशाबाबत जो निर्णय घेतला तो याेग्य आहे. मात्र, तितकासा परिपूर्ण नाही. कारण विद्यार्थी ९ वीपेक्षा दहावीत अधिक अभ्यास करतात. ९ वीचे गुण निकालासाठी ग्राह्य धरले तर निकालावर परिणाम होईल. तसेच निकालाच्या मूल्यांकनात अधिक वेगळ्या दृष्टीने विचार करता आला असता. तसेच ११ वी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार पण ती ऑनलाइन की ऑफलाइन होणार हे महत्त्वाचे. परीक्षा रद्द म्हटल्यामुळे अनेक मुलांनी अभ्यास थोडासा बाजूला ठेवला होता. आता पुन्हा सीईटी म्हटल्यावर त्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने मुलांचा गोंधळ उडेल.
- चंद्रकांत जाधव, मुख्याध्यापक, शेठ ब. मा. पडवळ विद्यालय
-------------
या वर्षी जो निकाल येईल तो विद्यार्थी, पालकांनी मान्य करायला हवा. निकाल आणि प्रवेशाबाबत शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. पण आता त्याची अंमलबजावणी योग्य झाली पाहिजे. ज्या मुलांना मोठ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे आहेत त्यांचीच सीईटी घ्यावी. ज्या शाळांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश घ्यायचे आहेत, त्यांची सीईटी घेतली नाही तरीही चालू शकते. जिथे महानगरांमध्ये सेंट्रलाईज पद्धतीने प्रवेश होतात, तिथेच सीईटी घ्यावी. तसेच ती फॅकल्टीनिहायच घेता येईल.
- सुरेंद्र दिघे, संस्थापक, अध्यक्ष, मराठी शाळा संस्थाचालक संघ