- नारायण जाधवठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ डिसेंबरच्या कल्याण येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डोंबिवली-तळोजा या नव्या मेट्रोमार्गाची घोषणा केली होती. परंतु, प्रत्यक्षात एमएमआरडीएने आपल्या २१ नोव्हेंबरच्या बैठकीत मेट्रो-१२ च्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) वर शिक्कामोर्तब करून ती डोंबिवलीमार्गेच धावणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेच्या महिनाभर आधीच मेट्रो ही कल्याणहून डोंबिवलीमार्गे धावणार असल्याचे एमएमआरडीएने निश्चित केले होते, हे या बैठकीचे जे इतिवृत्त दि. २४ डिसेंबरला प्रसिद्ध केले आहे, त्यावरून स्पष्ट झालेआहे.मेट्रो-५ अर्थात ठाणे-भिवंडी-कल्याणचाच मेट्रो-१२ हा विस्तारित मार्ग असल्याचे दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने आॅक्टोबर २०१८ मध्ये एमएमआरडीएला सादर केलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. हा मार्ग पूर्ण करण्यासही डिसेंबर २०२१ ची डेडलाइन आहे.मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली-तळोजा हा नवा मार्ग सुरू करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर खा. श्रीकांत शिंदे यांनी २१ नोव्हेंबरच्या बैठकीत मंजूर केलेला डीपीआर खरा की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ डिसेंबरला घोषित केलेला डोेंबिवली-तळोजा हा मार्ग खरा, असा प्रश्न करून संभ्रम दूर करावा, असे आवाहन केले होते. मात्र, आता एमएमआरडीएच्या इतिवृत्तानंतर या सर्व वादावर पडदा पडला आहे.ग्रोथ सेंटरसह नवी मुंबई विमानतळाला फायदाकल्याणनजीकचे ग्रोथ सेंटर, २७ गावे, नैना परिसरासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील वसाहती, औद्योगिक पट्टा यांना फायदा होईल. शिवाय इंधन, प्रवासाचा वेळ यात बचत होणार असून हवा, ध्वनिप्रदूषण कमी होऊन प्रवाशांना सुरक्षित असा गारेगार प्रवास करता येईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.पहिल्या टप्प्याचे भाडे १० रुपयेकल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रो-१२ हा मार्ग २०.७५ किमीचा असून या मार्गावर एकूण १७ उन्नत स्थानके राहणार आहेत. या मार्गावर सध्या ४१३२ कोेटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. इतर मेट्रोमार्गांप्रमाणेच या मार्गावरील पहिल्या तीन किमीच्या टप्प्याचे भाडे १० रुपये असून पुढे ते १२ किमीपर्यंत २० रुपये, १८ किमीपर्यंत ३० रुपये, २४ किमीपर्यंत ४० रुपये ३० किमीपर्यंत ५० रुपये, ३६ किमीपर्यंत ६० रुपये, ४२ किमीपर्यंत ७० रुपये आणि त्यापुढील टप्प्यासाठी ८० रुपये असेल, असे एमएमआरडीएने म्हटले आहे.अशी असेल प्रवासीसंख्यामे.ली. असोसिएट्सचा २००८ चा अहवाल आणि एमएमआरडीए, सिडको यांच्या २०१६-३६ च्या अहवालांच्या आधारे दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने या मार्गावर एमएमआरडीए क्षेत्रातील २९.३२ लाख, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील २.४४ लाख आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ३.४८ लाख प्रवासी प्रवास करतील, असे गृहीत धरले आहे.जमीन देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवररेल्वेमार्ग, १७ स्थानके, कारडेपो आणि विद्युतव्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर कायमस्वरूपी जमीन संपादन करावी लागणार आहे. यात कारडेपो आणि विद्युतकर्षण केंद्रासाठी आवश्यक ती शासकीय किंवा खासगी जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यात्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवण्यात आली आहे.
डोंबिवलीमार्गे मेट्रो धावण्याचा निर्णय महिनाभरापूर्वीच , १७ स्थानके प्रस्तावित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 6:36 AM