ठाणे : राज्यात भाजपा आणि शिवसेनेची सत्ता असतानासुद्धा स्थानिकांना मुलुंड येथील टोल बंद करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपाच्या नगरसेवकाने आंदोलन केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने नगरसेवक भरत चव्हाण यांनी या टोलनाक्यावर आंदोलन केले. यावेळी आपल्याच सरकारविरोधात त्यांनी नागरिकांच्या मदतीने घोषणाबाजीही केली.सत्तेत येण्यापूर्वी कोपरीकरांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे, असा आग्रह धरणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे एमएसआरडीसी खाते स्वत:कडे असतानादेखील याविषयी आता मूग गिळून का गप्प बसले आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी केला.ठाणे शहरात येण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर टोलनाके ओलांडावेच लागतात. त्यात कोपरी, आनंदनगर येथील टोलनाका म्हणजे स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. टोलपासून १० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना टोल माफ असल्याचा अध्यादेश असतानासुद्धा स्थानिक नागरिकांकडून जबरदस्तीने टोल वसूल केला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. कोपरी, पाचपाखाडी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षात असताना त्यांनी कोपरीकरांना टोलमुक्ती देऊ, अशी घोषणा केली होती. कोपरीकरांनी त्यांच्या या आश्वासनाला भुलून त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. निवडून येताच ठाण्यातील सर्व आमदारांनी टोल न भरता मुंबईत शपथविधीसाठी प्रयाण करत याच टोलनाक्यावर मोठी स्टंटबाजी केली होती. परंतु, सत्तेत येताच एमएसआरडीसी खाते ताब्यात येऊनही कोपरीकरांचे टोलमुक्तीचे स्वप्न पालकमंत्र्यांनी अपुरे ठेवल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.>साडेचार वर्षांत निराशाकाही दिवसांपूर्वी या टोलमुक्तीसाठी चव्हाण यांनी महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर, आता हे आंदोलन करण्यात आले. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात लोकांच्या पदरी निराशा आल्याने कोपरीकरांनी हे आंदोलन केले.
टोलमुक्तीसाठी भाजपा नगरसेवकाची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:34 AM