अंबरनाथ : अंबरनाथमधील वाचन संस्कृती जपण्यासाठी आणि ती संस्कृती वाढविण्यासाठी अंबर भरारीच्या सदस्यांच्या घरी बसणाऱ्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांनी हार-मोदकाऐवजी एक पुस्तक आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अंबर भरारीचे संस्थापक सुनील चौधरी यांच्या घरात भाविकांनी देवाला पुस्तके अर्पण करुन या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.अंबर भरारी या संस्थेच्या पुढाकाराने शहराता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणी लहानसे का होईना वाचनालय तयार करुन अंबरनाथ शहर हे पुस्तकांचे गाव म्हणून लोकप्रिय करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शासकीय कार्यालये, महत्वाच्या शाळा, महाविद्यालये, मंदिर, चौक आणि ज्या ज्या ठिकाणी नागरिकांचा वावर असेल त्या त्या ठिकाणी लहानसे वाचनालय उभारण्यात येत आहे. या वाचनाच्या उपक्रमासाठी नागरिकांनी आणि सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. घरात पडून राहिलेली, किंवा वाचून झालेली पुस्तके अंबर भरारीच्या कार्यालयात जमा केली जात आहेत. तसेच अनेकांना पुस्तकांच्या स्वरुपात मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला चांगला प्रतिसाद लाभला आहे. असंख्य पुस्तके मदतीच्या स्वरुपात कार्यालयात एकत्रित झाली आहेत. या पुस्तक भांडारात आणखी वाढ करण्यासाठी अंबर भरारीचे संस्थापक चौधरी यांनी घरातील गणपतीसोबत संस्थेच्या सर्व सदस्यांना आपल्या घरातील गणेशाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना पुस्तक स्वरुपात देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सदस्यांनी आवाहन केले. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. पुस्तक चळवळीच्या माध्यमातून वाचन संस्कृती जपण्याच्या या प्रयत्नाला मोठा प्रतिसाद लाभला असून पुस्तकांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रत्येक आलेल्या पुस्तकांची छाननी करुन ती आवश्यक त्या ठिकाणी वाचनालयात ठेवण्यात येणार आहे. या उपक्रमाला शहरातील इतर वाचनालयेही मदत करीत असल्याने त्याची व्याप्ती वाढत आहे.गणेशोत्सवात हार, फळे आणि मोदक यांच्या किमती वाढलेल्या असतात. तसेच असंख्य भाविकांनी अर्पण केलेले हे पदार्थ पडून राहतात. त्याचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे प्रसादाच्या गोडधोड पदार्थांऐवजी गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीने एकतरी पुस्तक आणले तर त्याचा लाभ इतरांना कायमस्वरुपी होईल. या प्रयत्नाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.- सुनील चौधरी, संस्थापक,अंबर भरारी
गणपतीला हार, मोदकाऐवजी पुस्तक देण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 3:39 AM