प्रज्ञा म्हात्रेनौपाडा परिसरातील विष्णुनगर येथील हिंदू जागृती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ गेली २८ वर्षे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे. या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक विचारांचा मेळ घडवून आणला जातो. केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक नव्हे, तर सामाजिक उपक्रमांवरदेखील मंडळाचा भर असतो. विशेष म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते गणेशोत्सव कार्यक्रमांची पत्रिका ठाण्यातील तीन हजार घरांत जाऊन वाटतात. मोठ्या संख्येने ठाणेकर या कार्यक्रमांना उपस्थित राहतात.
मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे २९ वे वर्षे आहे. समाज संघटन, प्रबोधन आणि जागृती करण्याचा प्रयत्न या मंडळाने करण्याचे ठरवले म्हणून मंडळाचे नाव हिंदू जागृती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ असे ठेवण्यात आले असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव या वार्षिक उपक्रमापर्यंत मर्यादीत न राहता मंडळाने भेटीगाठी हा उपक्रम राबवला. दरमहा परिसरातील एखाद्या गृहसंकुलाच्या आवारात किंवा गच्चीमध्ये हा कार्यक्रम घेतला जातो. या कार्यक्रमात साहित्य, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रातील कार्यरत शासकीय अधिकाऱ्यांसोबत खुला संवाद साधण्यात येतो. गणेशोत्सव काळात श्रींच्या दर्शनास साधारणपणे १० हजार गणेशभक्त येतात. सहयोग मंदिर सभागृहात आयोजित निरनिराळ््या कार्यक्रमास प्रतिदिन ३०० ते ४०० नागरिकांची उपस्थिती असते. लक्षावर्तन पूर्णाहुती ब्रह्मणस्पती गणेशयाग कार्यक्रमास तीन हजार लोक भेट देतात. त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात सायंकाळी सहयोग मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेले बासरीवादक अमर ओक यांचे बासरी वादन, बाल किर्तनकार ह.भ.प. लक्ष्मीप्रसाद पर्वरी यांचे कीर्तन, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे काश्मीर ३७० या विषयावरील व्याख्यान, ब्रह्मणस्पती गणेश याग, प्रथमेश लघाटे यांच्या मराठी गाण्यांची मैफील यासारखे दर्जेदार कार्यक्रम असून दोन ते तीन हजार तरुण तरुणी अर्थात युवा शक्ती यांचा सहभाग असलेली देशभक्तीपर गीतांवर टाळ आणि ढोलाच्या गजरात निघणारी मिरवणूक. सदर मिरवणूकीत जोश खूपच असतो. वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाचे सांगता ‘वंदे मातरम’ने केली जाते.
मंडळाचे सल्लागार डॉ. सुधीर रानडे यांनी गणेशोत्सवाचे किस्से कथन करताना सांगितले की, गणेशोत्सव सुरू केल्यानंतर त्याच्या दुसºया वर्षी म्हणजे १९९२-९३ साली औरंगजेबाने पाडलेले काशिविश्वेश्वर या मंदिराची सजावट साकारली होती. पोलिसांनी या सजावटीवर आक्षेप घेत ही सजावट काढून टाकण्यास सांगितले. त्यावेळी या सजावटीबाबत एका वृत्तपत्रात दोन लेख छापून आले आणि हजारो शिवसैनिकांनी येथे भेट दिली. या सजावटीची प्रचंड चर्चा झाली होती. ‘मोडीली मांडिली क्षेत्रे’ या संकल्पनेवर आधारीत मंडळ गेली १७ वर्षे सजावट साकारत असे. त्यात इस्लामी आणि ख्रिस्ती आक्रमणात उद्ध्वस्त करण्यात आलेली मंदिरे ही सजावट आणि दृकश्राव्याच्या माध्यमातून दाखवली जातात. त्यामुळे अनेकदा वाद व्हायचे, पोलीस आक्षेप घेत, वाद झाला की स्वत: आनंद दिघे येऊन ते वाद मिटवत असत. मंडळाने प्रतापगड युद्ध, काश्मीर, लालमहल यांचे देखावे साकारले होते त्यावेळी पोलिसांनी आक्षेप घेतला होता. सातत्याने घेतल्या जाणाºया आक्षेपांविरुद्ध मंडळ तीनदा हायकोर्टात गेले आणि तिन्हीवेळा मंडळाच्या बाजूने निकाल लागला असल्याचे डॉ. रानडे यांनी सांगितले. वसंतराव डावखरे, भगवानराव पटवर्धन, अण्णा व्यवहारे, डॉ. शांताराम आपटे अशा अनेकांनी या उत्सवाला भेट दिली तर मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाºया कार्यक्रमांत शंकर अभ्यंकर, चारुदत्त आफळे, शरद पोंक्षे, प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ, हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते अशा अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली आहे. मालिकांचे कलाकारही या मंडळात येऊन गेले आहेत.गणेशोत्सव म्हणजे दुथडी भरून वाहणारा उत्साह, मिष्टान्नाची मेजवानी, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, अंग मोडून थिरकण्याची संधी आणि भक्तिभावाचा सोहळा. ठाणे जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपापल्या परीने हा उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपतात. काही मंडळे उत्तमोत्तम देखावे तयार करून गुणग्राही कलारसिकांची दाद मिळवतात. काही सांस्कृतिक संचिताची जपवणूक करण्याचे ब्रीद जपतात. मात्र या सोहळ्याला थिल्लर स्वरूप येणार नाही, याची काळजी सारेच आपापल्या परीने घेतात. मागील काही वर्षांपासून मिरवणुकीत अश्लील हावभाव करीत नृत्य सादर करणे, थिल्लरपणा होत असल्याने भाविक अशा मंडळाच्या कार्यकर्त्यांवर नाराज आहेत. यामुळे उत्सवाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो. पण शिस्त पाळणाºया अशा मंडळांपैकी तीन प्रातिनिधिक मंडळांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा, उपक्रमांचा, परंपरांचा घेतलेला सखोल आढावा.
नौपाडा परिसरातील विष्णुनगर येथील ‘हिंदू जागृती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ’ हे सजावटींकरिता ओळखले जाते. गणेशोत्सवाच्या प्रारंभापासून येथील सजावटींवरील आक्षेपामुळे मंडळ चर्चेत आले व लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. ‘मोडीली मांडिली क्षेत्रे’ या संकल्पनेवर आधारित केलेली आरास अनेकदा वादळी ठरल्याने मंडळाला न्यायालयीन लढाई लढावी लागली. मात्र मंडळालाच या कायदेशीर लढाईत यश लाभले.