लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या या दुस-या लाटेला तोंड देण्यासाठी सध्या संचारबंदी सुरू आहे. संचारबंदीच्या या कालावधीत रुग्णसंख्या कमी होण्यासह व्हेंटिलेटरसह ऑक्सिजनवरील गंभीर रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. गेल्या १२ दिवसांचा विचार करता तब्बल ३ हजार ३८३ ने गंभीर रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त केले आहे. यामुळे जिल्ह्यात सध्या ५ हजार २८२ गंभीर रुग्ण आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे सध्या २१ हजार २६५ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांपैकी बरे होण्याचे प्रमाण शुक्रवारी ९४.३ टक्के झाले आहे. तर मृतांचे प्रमाण १.६८ टक्के आहे. या बारा दिवसांत रुग्णसंख्या १० हजारने कमी झाल्याचे समाधान या संचारबंदीत उघड झाले आहे. मात्र, या कालावधीत मृतांचे प्रमाण ०.०५ टक्क्याने किंचितसे वाढलेले दिसून येत आहे. शिवाय रुग्णवाढीचे प्रमाणही मोठ्या संख्येने कमी झाले आहे.
शहरनिहाय रुग्णांची संंख्या
गंभीर रुग्णांचा विचार करता जिल्ह्यात ५ हजार २८२ रुग्ण व्हेंटिलेटरसह ऑक्सिजनवर सध्या उपचार घेत आहे. यापैकी ५ हजार ७०८ रुग्ण ऑक्सिजनवर आहे. तर व्हेंटिलेटरवर ५७४ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रात ३ हजार ९७३ रुग्ण ऑक्सिजनवर असून ५२२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. यापैकी कल्याण डोंबिवली परिसरात १ हजार १८७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ६१ व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. या रुग्णसंख्येत मात्र शहरात २० रुग्णांची वाढ दिसून येत आहे. या खालोखाल नवी मुंबईत १ हजार १६८ ऑक्सिजनवर तर २०५ व्हेंटिलेटरवर आहे. यानंतर ठाणे मनपा क्षेत्रात ७८५ रुग्ण ऑक्सिजन आहे. यात तब्बल ७१४ रुग्णांची घट झाली आहे. तर १६७ व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. मीरा-भाईंदर महापालिका परिसरात ६२८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. यात ३५० रुग्णांची घट झाली असून व्हेंटिलेटरवर ६९ उपचार घेत आहेत. या तुलनेत भिवंडी परिसरात ११८ ऑक्सिजनवर असून १८ व्हेंटिलेटरवर आहेत. उल्हासनगरमध्ये ८७ जण ऑक्सिजनवर व दोन व्हेंटिलेटरवर आहेत. अंबरनाथला २६६ व बदलापूरला ३८२ जण ऑक्सिजनवर आहे. तर या शहरांमध्ये अनुक्रमे २९ व १८ जण व्हेंटिलेटरवर आहेत. याशिवाय ग्रामीण भागाच्या गावपाड्यातील ८७ रुग्ण ऑक्सिजन तर पाच जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.