ठाणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून सध्या रोज जिल्ह्यात २०० ते २२५ च्या आसपास रुग्ण नव्याने आढळत आहेत. परंतु, त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चाचण्यांमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. मधल्या काळात दुकाने व इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केल्याने ही संख्या काहीशी वाढली होती. परंतु, आता ठाण्यासह जिल्ह्याच्या इतर शहरांत कोरोना चाचण्यांची संख्या घटली आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसरी लाटही आता ओसरताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सद्य:स्थितीला दिवसाला २०० ते २२५ रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यात पाच लाख ५० हजार ५७७ जणांना कोरोनाची लागण झाली असून ११ हजार २७६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पाच लाख ३६ हजार ९४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.५२ टक्क्यांवर आले आहे. त्यातही आता जे रुग्ण बाधित होत आहेत, त्यांचे नातेवाईकच केवळ कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळेच ही संख्या घटली आहे. जून आणि जुलै महिन्यामध्ये सुमारे २० हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या. परंतु, आता ऑगस्ट महिन्यात त्यात घट झाली आहे.
शहरनिहाय कोरोना चाचण्यांची संख्या
शहर - जून - जुलै - ऑगस्ट
ठाणे - १०३०८६ - ८४०७० - ७९८२२
कल्याण-डोंबिवली - ४३७७४ - ३७२८७ - ३८८७६
भिवंडी - ८२५७ - ८२५७ - ५८४२
उल्हासनगर - ९५२० - ९५२० - १४८५९
अंबरनाथ - १०३२० - १०३२० - ६०९५
बदलापूर - ९८९१ - ९८९१ - ७०२७
नवी मुंबई - ४५६९० - ४५६९० - ६१४०९
मीरा-भाईंदर - १०९९९९ ११४०९२ - ७९४८९
ठाणे ग्रामीण - १५७९५ - १५७९५ - १५१७७