ठाणे : दिवाळीच्या काळात एकीकडे ध्वनीप्रदूषणात घट झाली आहे. दुसरीकडे याच कालावधीत आगी लागण्याच्या घटनांमध्येही ६० ते ६५ टक्यांची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने केलेल्या जनजागृतीचा फायदा यावेळी झाल्याचे दिसून आले आहे. तसेच उंच उडणाऱ्या फटाक्यांच्या मागणीतही झालेली घट यामुळेही आगीच्या घटनांना आळा बसल्याचे दिसून आले आहे.
दिवाळीच्या सणात एकतर ध्वनी प्रदूषण, वायु प्रदुषणामुळे आरोग्याचे प्रश्न गंभीर होताना दिसतात. तर दुसरीकडे याच कालावधीत काही चुकांमुळे आगींच्या घटनांमध्येही मागील काही वर्षांत वाढ झाली होती. कुठे उघड्या कचºयावर फटाके फोडणे, चुकीच्या पद्धतीने रॉकेट लावणे, फटाक्यांच्या लड लावतांना काळजी न घेणे यांसह विविध कारणामुळे आगीच्या घटनांमध्या वाढ झाल्याचे दिसून येत होते. मात्र, यंदा दिवाळीच्या आधीच महापालिकेने जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला होता. फटाके विक्रीकेंद्राच्या ठिकाणी विक्रेत्यांना याविषयाची माहिती दिली होती. तसेच प्रत्येक प्रभाग समितीनिहाय असलेल्या फटाके स्टॉलवाल्यांनाही आगी नेमक्या कशामुळे लागू शकतात, त्या लागू नयेत यासाठी कशा पद्धतीची कोणती काळजी घेतली पाहिजे अशा स्वरुपाची जनजागृती केली होती. तर शहराच्या विविध भागात, पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमातूनही ती केली होती. त्यामुळेच आगीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे बोलले जात आहे.यंदा पाच दिवसांत आगीच्या २१ घटना२०१६ मध्ये दीपावलीच्या पाच दिवसात ३१ आगीच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. तर २०१७ मध्ये आगींच्या घटनांमध्ये घट होऊन या कालावधीत केवळ २० आगीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, २०१८ मध्ये यामध्ये पुन्हा तीनपट अधिक वाढ होऊन हा आकडा थेट ५३ च्या घरात गेला होता.यावेळी दिवाळीच्या चवथ्या दिवशी आगीच्या १४ घटना घडल्या होत्या. तर २०१९ म्हणजेच धनत्रयोदेशीपासून दिवाळीच्या पाच दिवसांत आगीच्या २१ घटना घडल्या असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहानी झाली नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.