मुंबईः मेट्रो प्रकल्प फक्त वृक्षतोडीसाठी आखले जात नाहीत. वृक्षतोडीला विरोध हा दावा फक्त बचावासाठी असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. ठाणे मेट्रोसाठी होत असलेल्या वृक्षतोडीला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं याचिकाकर्त्याला फटकारलं. मेट्रो प्रकल्प केवळ वृक्षतोडीसाठीच आखलेत, असा काहींचा समज झालाय. विरोध मेट्रोला नाही वृक्षतोडीला असल्याचा दावा निव्वळ बचावासाठी आहे. मेट्रो प्रकल्पामागचं विशेष उद्दिष्ट ध्यानात घ्या, असंही न्यायालयानं याचिकाकर्त्याला सुनावले आहे.ठाणे मेट्रोसाठी तीन हात नाका भागातील झाडे अडसर ठरत होती. ‘एमएमआरडीए’कडून वृक्षतोड करण्यात आली होती. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता. ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या परिसरात ही घटना घडली असून, त्याकडे महापाालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका करण्यात येत होती.वडाळा-घाटकोपर-ठाणे- मुलुंड- कासारवडवली ही मेट्रो- 4 आणि ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो-5 या दोन्ही मार्गिका ठाणे येथे जोडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बनवली आहे.ठाणे येथे दोन्ही मार्गिकांचे संयुक्त मेट्रो स्थानकही बनवण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडाही बनवण्यात आला आहे. 24 किलोमीटरच्या मेट्रो-5 मार्गावर 17 स्थानके प्रस्तावित आहेत. 2021पर्यंत या मार्गावर 2 लाख 30 हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. मेट्रो-4 आणि मेट्रो-5 हे दोन्ही प्रकल्प 2021पर्यंत कार्यरत होणार आहेत.
वृक्षतोडीला विरोध हा दावा फक्त बचावासाठी, न्यायालयानं याचिकाकर्त्याला फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 3:36 PM