भाईंदर : भाईंदरच्या तोदी बंगल्यापासून अनेक वर्ष रखडलेल्या रस्ता विस्तारीकरणाच्या कामास सुरूवात झाली असली तरी कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरण्यासह पालिकेने दिलेल्या निर्देशाचे पालन केले जात नसल्याने मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कंत्राटदारास तीन नोटिसा बजावल्या आहेत. तरीही कामात सुधारणा न झाल्याने सुमारे पावणे तीन कोटी रुपयांच्या या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भार्इंदर पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या पश्चिम बाजूने दीडशे फूट रस्ता विकास आराखड्यात आहे. हा रस्ता पुढे सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जातो. परंतु येथे राधास्वामी सत्संगाच्या प्रवेशद्वारापासून मैदानापर्यंतच्या रस्त्यात तोदी वाडी आणि बंगल्याचा अडथळा असल्याने अनेक वर्षांपासून हे काम रखडले होते. मालकी हक्कावरून कायदेशीर वाद आदी कारणे या रखडपट्टी मागे होती. दरम्यान ही जागा सेव्हन इलेव्हन कंपनीने भागीदारीत खरेदी केली होती. यातील कायदेशीर अडचण दूर होऊन जमीनधारकांना मोबदला देण्याचे निश्चित झाल्याने येथील जुना बंगला, झाडे तसेच अतिक्रमण हटवण्यात आले.दरम्यान, महापालिकेने रूंदीकरणासाठी बोरिवलीच्या आर एन्ड बी इन्फ्रा प्रॉजेक्टस या कंत्राटदारास २३ आॅक्टोबर २०१८ मध्ये कामाचा कार्यादेश दिला होता. पालिकेच्या अंदाजपत्रकानुसार हे काम ३ कोटी २२ लाख १५ हजारांचे असताना कंत्राटदाराने मात्र २ कोटी ७७ लाखांची निविदा भरली होती असे कार्यादेशाच्या प्रतीवरून दिसून येते. या कामाची मुदत एक वर्षाची आहे.कंत्राटदारास कामाच्याबाबतीत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी १६ मे रोजी पहिली नोटीस दिली होती. त्यामध्ये काम संथगतीने सुरु आहे. रस्त्याच्या मध्यभागी व कडेला मार्किंग करून लेव्हल घेण्याचे सूचित केले होते परंतु त्याचे पालन केले नाही. काम करताना प्र्रत्येक लेअर बांधकामा विभागामार्फत तपासून मगच पुढील लेअरचे काम करायचे आहे. नाल्याच्या कामाचे काँक्रिटीकरण करतानाही विभागाकडून तपासणी करूनघेतली नाही आदी गंभीर ठपके ठेवले आहेत.परस्पर काम केल्यास व तपासणी न केलेल्या कुठल्याही कामाचे देयक दिले जाणार नाही तसेच कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित केली जाईल असा इशारा देण्यात आला. सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याने अपघात घडल्यास तुम्हाला जबाबदार धरू असे कंत्राटदारास नोटिसीमध्ये बजावले होते. पण नोटिसीचा खुलासा न केल्याने खांबित यांनी २७ मे रोजी कंत्राटदारास दुसरी नोटीस बजावली होती.काळ््या यादीत का टाकू नये?३ जून रोजी खांबित यांनी अंतिम नोटीस कंत्राटदाराला बजावतानाच सोलिंगसाठी पांढरा दगड तसेच क्वोरी स्पॉईल हे निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरले जात असल्याचे कळवले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने पांढरा दगड व क्वोरी स्पॉईल काढून घ्यावे. तो पर्यंत पुढील कामे करू नये. तसेच आपणास काळ्या यादी का टाकण्यात येऊ नये याचा खुलासा करावा असे नोटिसीत बजावले आहे.विकासकामांच्या नावाखाली कंत्राटदाराकडून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याबद्दल शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारने यात जातीने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
रस्त्याच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य; पालिकेकडून नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 1:12 AM