कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे कंत्राट आर अॅण्ड बी कंपनीला दिले गेले आहे. मात्र, या कंपनीकडून वेळेवर कचरा उचलला जात नाही. त्यामुळे अनारोग्याची स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. याप्रकरणी शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी कंत्राटदाराविरोधात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली आहे.
महापालिका हद्दीतून दररोज ६५० टन घनकचरा गोळा होतो. केडीएमसीच्या १० प्रभाग क्षेत्रांपैकी चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे काम आर अॅण्ड बी कंपनीला दिले आहे. मात्र, या कंपनीकडून कचरा उचलण्याचे काम योग्य प्रकारे केले जात नाही. याप्रकरणी महासभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. कंत्राटदाराने कचरा वर्गीकरण करून तो गोळा करायचा आहे. मात्र, कंपनी सरसकट कचरा उचलून डम्पिंगवर नेत आहे, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे.
कचरा वर्गीकरणाची सक्ती महापालिकेने नागरिकांना केली आहे. त्यामुळे महापालिकेने कचरा कुंड्या हटविल्या आहेत. असे असतानाही अनेक ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही. कचरा रस्त्याच्याकडेला टाकला जातो. तसेच जेथे कुंड्या होत्या तेथे कचरा पडलेला असतो. यापूर्वी सरसकट कचरा उचलून त्याचे वजन करून तो डम्पिंगवर टाकला जात होता. त्यामुळे कंत्रटदाराच्या कचरा गाडीचे वजन जास्त भरले जात होते. कचरा उचलण्याचे बिलही जास्तीचे पाठविले जात होते. आता कचरा पुरेसा साचल्यावरच जास्तीचे वजन भरण्यासाठी तो उशिराने उचलला जात आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.