लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात जुलै महिन्यात तब्बल ९०० मिमी. पाऊस झाला आहे. या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने ७८२ हेक्टर शेतजमिनीसह पिके फळबागांचे नुकसान झाले आहे. याचा फटका जिल्हाभरातील दोन हजार ९०८ शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना आजघडीला मिळणे गरजेचे आहे. मात्र, त्यास विलंब झाला आहे. त्यामुळे या रकमेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या या शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात पावसामुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सहा जण जुलैतील शेवटच्या आठवड्यामधील अतिवृष्टीने दगावले आहेत. या प्रत्येक मयताच्या वारसाला मात्र शासनाने तत्काळ पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. पण याच अतिवृष्टीत जिल्ह्यातील ७८२ हेक्टरवरील शेतीच्या नुकसानीकडे शासनाने अजूनही लक्ष दिले नाही. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी लाखो रुपयांच्या नुकसानभरपाईच्या रकमेपासून वंचित आहेत.
अतिवृष्टीने भातपिकासह फळबागा आणि शेतजमीन वाहून गेली आहे. शेताची बांधबंदिस्ती फुटली आहे. त्यामुळे शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेतात ओव्हळ पडले आहेत. शेत नापीक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या अतिवृष्टीत तब्बल ६७३.५ हेक्टरवरील भातपिकाच्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यास बसलेला आहे. या दरम्यान ०.५ हेक्टर बागायत, फळबाग वाहून गेली. जिल्ह्याभरातील ९० हेक्टर शेतीचे बांध फुटले आहेत. याशिवाय हाताशी आलेल्या १८ हेक्टरवरील भाजीपाल्याचे या अतिवृष्टीत नुकसान झाले आहे.
----------