लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी मुंब्रा रेतीबंदर परिसरातील रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या लोखंडी पुलावर गर्डर बसविण्याचे काम शनिवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले होते. मात्र, कामाच्या नियोजनानुसार रविवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, गर्डर बसविताना त्याचा बॅलन्स बिघडल्याने निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे कामास विलंब झाला. परिणामी सोमवारी रात्री उशिरापर्यंतही गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झालेले नव्हते. यामुळे रेतीबंदर येथील मुख्य, रस्ता तसेच बायपास रस्त्यावरून होणारी अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. या कामामुळे सोमवारी कल्याण-शीळ, ठाणे-बलापूर, मुंबई-नाशिक आणि पूर्वद्रुतगती महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. दरम्यान, मध्यरात्री पनवेलकडे जाणारी मार्गिका खुली करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुंब्रा उपविभागाचे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.