ठाणे : व्यासपीठावर लोकप्रतिनिधींची तर व्यासपीठाखाली पुरस्कार विजेत्यांच्या नातेवाईक, हितचिंतकांची भाऊगर्दी... त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल दोन तास उशीरा कार्यक्रमस्थळी आगमन... पुरस्कार वितरणाच्यावेळी मोबाईलमध्ये फोटो काढण्याकरिता उडालेली झुंबड यामुळे ठाणे महापालिकेचा पुरस्कार वितरण सोहळा म्हणजे सावळागोंधळ ठरला. परिणामी पुरस्कार सोहळा पाहण्याकरिता आलेल्या प्रेक्षकांनी कार्यक्रमामधून काढता पाय घेतला. अनेक प्रेक्षकांनी ढिसाळ आयोजनाबद्दल नाराजी व्यक्त करीत होते.
ठाणे महापालिकेचा ३६ वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी गडकरी रंगायतन येथे आयोजित केला होता. यात विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींना ठाणे भूषण, ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. पुरस्कार वितरण सोहळ््याची वेळ सायंकाळी ५ वाजताची होती. मात्र, खुद्द पालकमंत्री या सोहळ््याला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आले. सोहळ््याकरिता वेळेवर आलेल्या प्रेक्षक, सत्कारमूर्तींची कार्यक्रम लांबल्याने चुळबुळ सुरू होती. त्यातच उपस्थित लोकप्रतिनिधींचे सत्कार आणि लंबीचौडी भाषणे यामुळे मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबलेला हा कार्यक्रम कधी संपतो, अशी पुरस्कारप्राप्त व्यक्ती व त्यांच्या नातलगांची भावना झाली होती. अगोदर दोन तास विलंब झालेला. त्यात गर्दीने सभागृह तुडूंब भरल्याने ज्येष्ठांना नैसर्गिक विधिकरिताही बाहेर जाणे अशक्य झाले होते. पुरस्कारप्राप्त व्यक्तींची संख्या १२० हून अधिक असल्याने पुरस्कार विजेते, त्यांचे नातेवाईक, हितचिंतक सोडले तर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी हे गोंधळामुळे कंटाळून निघून गेले. पुरस्कार घेऊन झाल्यावर पुरस्कारप्राप्त झालेल्यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यामुळे सुरूवातीला भरगच्च भरलेले सभागृह शेवटी रिकामे झाले होते. शेवटीशेवटी रांग लावून पुरस्कार वाटपाची औपचारिकता उरकली गेली. लग्नाच्या मांडवात मुंज उरकून घ्यावी, त्याप्रमाणे ठाणे भूषण व अन्य पुरस्कारांसोबत गणेशोत्सव मंडळांचे पुरस्कारही याच कार्यक्रमात उरकून घेण्याची घाई ठाणे महापालिकेने नाहक केली. कार्यक्रम विस्कटण्याचे तेही एक कारण होते.नातेवाइकांची गर्दीच्ठाणे भूषण पुरस्कारांचे वितरण झाल्यावर ठाणे गौरव पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. व्यासपीठासमोर पुरस्कार घेणाºयांचे नातेवाईक, हितचिंतकांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. उभे राहून ते फोटो काढू लागले, ही गर्दी इतकी वाढत गेली की खुर्चीवर बसून सोहळा पाहत असलेल्या प्रेक्षकांना व्यासपीठावर काय चालले आहे तेच दिसत नव्हते.