कल्याण : सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी हे स्थानिक नसतात. त्यामुळे फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम असो, याविरोधात केली जाणारी कारवाई ते कोणत्याही दबावाला बळी न पडता सक्षमपणे करू शकतात. त्यामुळे या अधिकाऱ्यांकडे संबंधित विभागाचा कार्यभार सोपवा, अशा मागणीचे पत्र केडीएमसीचे स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले आहे.महापालिकेमध्ये फेरीवाला हटाव व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भातील जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. हे अधिकारी अनेक वर्षे महापालिका क्षेत्रांत काम करीत असल्यामुळे त्यांची अनधिकृत बांधकाम करणारे आणि फेरीवाले यांच्याशी ओळख निर्माण होते. त्यातून आर्थिक व्यवहार होऊन त्याचा परिणाम कारवाईवर होतो, याकडे सभापती म्हात्रे यांनी लक्ष वेधले. आजघडीला शहराचा बकालपणा वाढत असून यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. अतिक्रमणामुळे पदपथावरून चालणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. प्रतिनियुक्तीवर येणारे अधिकारी हे महापालिका क्षेत्रात राहत नाहीत. त्यामुळे ते येथील स्थानिकांशी अपरिचित असतात. त्यांना योग्य ते संरक्षण दिल्यास फेरीवाला हटाव असो अथवा अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई सक्षमपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
‘प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा’
By admin | Published: February 20, 2017 5:30 AM